दोनवेळा लोकसभा, तीनवेळा विधानसभा हरल्या! भाजपने राज्यपालांना राजीनामा द्यायला लावला, पुन्हा लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 13:53 IST2024-03-18T13:52:09+5:302024-03-18T13:53:47+5:30
सुंदरराजन या तामिळनाडूमधील नेत्या असून भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दोनवेळा लोकसभा, तीनवेळा विधानसभा हरल्या! भाजपने राज्यपालांना राजीनामा द्यायला लावला, पुन्हा लढवणार
तेलंगणाच्या राज्यपाल आणि पाँडीचेरीच्या उपराज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी आपल्या संविधानीक पदांचा राजीनामा दिला आहे. सुंदरराजन या तामिळनाडूमधील नेत्या असून भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सुंदरराजन यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये तेलंगाणाच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली होती. तसेच त्यांच्याकडे पाँडीचेरीच्या उपराज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी फेब्रुवारी २०२१ मध्ये सोपविण्यात आली होती. सुंदरराजन यांना पाँडिचेरीमधून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
उपराज्यपाल असल्याने पाँडिचेरीमध्ये त्या लोकांच्या ओळखीच्या झाल्या असाव्यात, याचा फायदा त्यांना मतदानात होईल असे भाजपाला वाटत आहे. याचबरोबर सत्ताधारी द्रमुकच्या कनिमोझी यांच्या थुथुकुडी जागेसह तामिळनाडूतील तीनपैकी एका जागेवरून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची देखील चर्चा आहे.
सुंदरराजन यांनी थुथुकुडीमधून 2019 ची निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला होता. तसेच 2009 मध्ये त्या चेन्नई (उत्तर) मधूनही लढल्या होत्या, तिथे देखील त्यांना पराभूत व्हावे लागले होते. एवढेच नाही तर त्या तीनवेळा विधानसभेलाही लढल्या होत्या, तिन्ही वेळा त्यांना दारुण पराभवाची चव चाखाली लागली होती.