...तर सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार; थेट दिल्लीतून विश्वजीत कदमांची घोषणा, ठाकरेंसोबत संघर्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:43 PM2024-03-27T16:43:22+5:302024-03-27T16:43:59+5:30

Sangli Lok Sabha Seat: विश्वजीत कदम यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी नवी दिल्ली येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांची भेट घेतली.

there will be a friendly fight in Sangli Announcement of congress leader Vishwajeet Kadam from Delhi | ...तर सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार; थेट दिल्लीतून विश्वजीत कदमांची घोषणा, ठाकरेंसोबत संघर्ष!

...तर सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार; थेट दिल्लीतून विश्वजीत कदमांची घोषणा, ठाकरेंसोबत संघर्ष!

Congress Vishwajeet Kadam ( Marathi News ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगली लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली असली तरी या जागेवरील दावा सोडण्यास काँग्रेस तयार नसल्याचं चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्यासह पक्षाचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी आज थेट दिल्ली गाठत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेतल्या. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि कोणत्याही स्थितीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसने ही जागा सोडू नये, अशी या नेत्यांची आग्रही मागणी आहे. विश्वजीत कदम यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी नवी दिल्ली येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस के. सी.  वेणूगोपाल आणि मुकूल वासनिक यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना विश्वजीत कदम यांनी आक्रमक शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.
 
"मी माझ्या भावना आमचे नेते राहुल गांधी यांच्यापर्यंतही पोहोचवणार आहे. मी यापूर्वी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आमची भूमिका मांडली होती. हे पत्र मी मल्लिकार्जुन खरगे यांनाही दिलं. सांगली लोकसभा मतदारसंघ आम्हाला हवा आहे आणि तो लढण्यास आम्ही सक्षम आहोत. आम्हाला विश्वास आहे की, महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस हा मतदारसंघ आपल्याकडे घेईल. जर-तरबाबत आज मी बोलणार नाही. मात्र या मतदारसंघात जर मैत्रीपूर्ण लढत काँग्रेस पक्षाला करायची असेल तर आम्ही त्यालाही तयार आहोत," असं म्हणत विश्वजीत कदम यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आव्हान दिलं आहे.

"सांगलीची जागा अजूनही काँग्रेसने सोडलेली नाही. आमचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी मी आक्रमकपणे भूमिका घेतलेली आहे," असंही विश्वजीत कदम म्हणाले. 

वर्षा गायकवाडांचीही ठाकरेंवर नाराजी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये मुंबईतील चार जागांचाही समावेश आहे. यावरून नाराजी व्यक्त करताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे की, "आताच्या घडीला एवढेच सांगेन की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगली लोकसभा आणि मुंबईतल्या ज्या लोकसभेच्या जागा, जिथे मित्रपक्षांमध्ये एकमत होणे अजून बाकी आहे, तिथे एकतर्फी उमेदवार जाहीर करायला नको होते. मुंबईचा मुद्दा जिथे आहे, यासंदर्भात आम्ही आमची नाराजी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली आहे आणि त्यांच्या आदेशानुसार पुढची पावलं उचलण्यात येतील," असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Web Title: there will be a friendly fight in Sangli Announcement of congress leader Vishwajeet Kadam from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.