वेगात आलेल्या ट्रकने कारला उडवले, दुचाकीस्वारालाही फरफटले; दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 13:43 IST2023-08-09T13:42:31+5:302023-08-09T13:43:02+5:30
शिमलाच्या वरील भागात ठियोग-हाटकोटी येथील छैला मार्गावर सायंकाळी ६.३० वाजता हा अपघात झाला

वेगात आलेल्या ट्रकने कारला उडवले, दुचाकीस्वारालाही फरफटले; दोघांचा जागीच मृत्यू
शिमला - हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यात अपघाताची भीषण घटना घडली. ट्रकच्या धडकेत एका ऑल्टो कारमधील मोहनलाल नेगी(५२) आणि पत्नी आशा नेगी (४३) यांचा जागीच मृत्यू झाला. शिमला जिल्ह्याच्या जुब्बल तालुक्यातील पंद्रानु येथे ही दुर्देवी घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
शिमलाच्या वरील भागात ठियोग-हाटकोटी येथील छैला मार्गावर सायंकाळी ६.३० वाजता हा अपघात झाला. वेगात आलेल्या ट्रकने एका दुचाकीस्वारासह तीन वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत एका कारमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. ठियोग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
डीएसपी सिद्धार्थ शर्मा यांनी सांगितलं की, नारकंडा येथून छैला मार्गे एक ट्रक आंध्र प्रदेशकडे जात होता. संफरचंदाच्या अंदाजे ६०० पेक्षा अधिक पेट्या घेऊन हा ट्रक मार्गावरुन धावत होता. मात्र, ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघाताची घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी मृत मोहनलाल नेगी आणि त्यांच्या पत्नी आशा नेगी यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत, सुदैवाने या दुर्घटनेत तीन जण बचावले आहेत.