Shatrughan Sinha will contest Lok Sabha election from Patna Sahib | शत्रुघ्न सिन्हा पाटणासाहिब येथून लढवणार लोकसभा निवडणूक, काँग्रेसने जाहीर केली उमेदवारी 
शत्रुघ्न सिन्हा पाटणासाहिब येथून लढवणार लोकसभा निवडणूक, काँग्रेसने जाहीर केली उमेदवारी 

नवी दिल्ली - आज काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना पक्षाने पाटणासाहिब येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघामध्ये आता भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात लढत रंगणार आहे.  

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची यादी आज दुपारी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये पाटणासाहिब येथून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली. गेल्या काही काळापासून भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर आज पक्षाल सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. 

पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक प्रसंगी थेट पक्षविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे ते फार काळ भाजपामध्ये राहणार नाहीत, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांच्या बंडखोरीमुळे पाटलीपुत्र या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी नाकारून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाले होते. मात्र त्यांचा काँग्रेसप्रवेश लांबणीवर पडला होता. अखेरीस आज काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

दरम्यान, ''भाजप हुकुमशाही पध्दतीने काम करु लागला आहे, वन मॅन शो झालाय. वन मॅन शो अ‍ॅन्ड इन टू मॅन आर्मी. हे दोघेजण मिळून पक्ष आणि सरकार चालवताहेत, अशी टीका खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत केली होती,'' 


Web Title: Shatrughan Sinha will contest Lok Sabha election from Patna Sahib
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.