शशी थरूर चौथ्यांदा रिंगणात, भाकपमुळे तिरंगी सामना; राजीव चंद्रशेखर विरोधातील लढत लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2024 07:55 AM2024-03-12T07:55:42+5:302024-03-12T07:58:45+5:30

थरूर येथे विजयाचा चौकार मारणार की चंद्रशेखर थेट जनतेतून संसदेत जाणार याचा निर्णय या मतदारसंघात होणार आहे.

shashi tharoor in fray for fourth time the fight against rajeev chandrasekhar is eye catching | शशी थरूर चौथ्यांदा रिंगणात, भाकपमुळे तिरंगी सामना; राजीव चंद्रशेखर विरोधातील लढत लक्षवेधी

शशी थरूर चौथ्यांदा रिंगणात, भाकपमुळे तिरंगी सामना; राजीव चंद्रशेखर विरोधातील लढत लक्षवेधी

चंद्रकांत कित्तुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : काँग्रेसने खासदार शशी थरूर यांना सलग चौथ्यांदा थिरुवअनंतपुरममधून उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात भाजपने तीनवेळचे राज्यसभा सदस्य असलेले, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना मैदानात उतरवले आहे. यामुळे ही लढत देशाचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे. थरूर येथे विजयाचा चौकार मारणार की चंद्रशेखर थेट जनतेतून संसदेत जाणार याचा निर्णय या मतदारसंघात होणार आहे.

भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी थिरुवअनंतपुरममधील उमेदवार जाहीर करून निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच रणांगणातील आपले मल्ल कोण असणार हे स्पष्ट केले. याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीनेही या मतदारसंघात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार पन्नायन रवींद्रन यांना रिंगणात उतरवले. यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे स्पष्ट आहे.

थरूर यांची शेवटची निवडणूक? 

शशी थरूर थिरुवअनंतपुरमधून सलग तीनवेळा निवडून आले आहेत. त्यांनी केंद्रात मनुष्यबळ विकास आणि परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघात त्यांनी सुमारे तीन दशके कार्य केले आहे. माझी ही शेवटची निवडणूक असेल असे संकेत त्यांनी यापूर्वी दिले होते. त्यांची मतदारसंघातील प्रतिमाही चांगली असली तरी प्रस्थापिताविरुद्धचा असंतोष थंड करून आपल्या प्रतिभा व प्रतिमेच्या जोरावर थरूर विजयाचा चौकार मारणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

चंद्रशेखर प्रथमच लोकसभेच्या मैदानात

उद्योगपती आणि तंत्रस्नेही असलेले राजीव चंद्रशेखर हे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योग राज्यमंत्री आहेत. ते २००६ पासून सलग तीनवेळा कर्नाटकातून राज्यसभा सदस्य आहेत. २०१९ मध्ये भाजप या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होता. दक्षिणेत भाजपचा पाया मजबूत करण्यासाठी भाजपचे प्रयत्न चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रशेखर यांना प्रथमच लोकसभेच्या मैदानात उतरविण्यात आले आहे.

शासकीय वाहन नाकारणारे रवींद्रन

भाकपचे उमेदवार पन्नायन रवींद्रन हे २००५ मध्ये लोकसभेवर निवडून आले होते. पक्षाचे राज्य सचिव असलेले पन्नायन यांचे मासिक उत्पन्न २१ हजार रुपये आहे. तेही पेन्शनच्या माध्यमातून मिळणारे. त्यांनी खासदार असताना कधीही शासकीय वाहनाचा वापर केलेला नाही. २००९ पूर्वी हा मतदार संघ डाव्यांचा बालेकिल्ला होता. तो पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.


 

Web Title: shashi tharoor in fray for fourth time the fight against rajeev chandrasekhar is eye catching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.