Rajasthan Lok Sabha Election Result 2024 : "प्राण जाए पर वचन न जाए", दौसामधून भाजपाच्या पराभवानंतर किरोरीलाल मीना देणार मंत्रीपदाचा राजीनामा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 15:29 IST2024-06-04T15:28:45+5:302024-06-04T15:29:34+5:30
Rajasthan Lok Sabha Election Result 2024 : आतापर्यंतच्या निवडणुकीत भाजपाला १४, काँग्रेसला ८, सीपीआय(एम) १, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष आणि भारत आदिवासी पार्टीला प्रत्येकी एक जागा मिळताना दिसत आहे.

Rajasthan Lok Sabha Election Result 2024 : "प्राण जाए पर वचन न जाए", दौसामधून भाजपाच्या पराभवानंतर किरोरीलाल मीना देणार मंत्रीपदाचा राजीनामा?
दौसा : देशभरात लोकसभा निवडणुकीचे सात टप्पे संपल्यानंतर आज मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, यावेळी राजस्थान लोकसभा निवडणुकीत मोठा बदल दिसून येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत क्लीन स्वीप करणाऱ्या भाजपाला यावेळी दहा जागांवर पराभव पत्करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत भाजपाला १४, काँग्रेसला ८, सीपीआय(एम) १, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष आणि भारत आदिवासी पार्टीला प्रत्येकी एक जागा मिळताना दिसत आहे.
दौसा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे मुरारीलाल मीणा विजयी झाले आहेत. भाजपाचे कन्हैयालाल मीना यांचा पराभव करत काँग्रेस नेते मुरारीलाल मीणा हे दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. दरम्यान, दौसामधून भाजपाचा पराभव झाल्यास किरोरीलाल मीना यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता येथून कन्हैयालाल मीना यांचा पराभव झाल्याने किरोरीलाल मीना यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
जीव गेला तरी चालेल पण वचन मोडणार नाही - किरोरीलाल मीणा
दरम्यान, भाजपा नेते आणि मंत्री किरोरीलाल मीणा यांनी मतमोजणीपूर्वी हे विधान केले होते. आता दौसा येथील भाजपा उमेदवाराच्या पराभवाच्या निकालानंतर किरोरीलाल मीणा यांनी सोशल मीडियावरील एक्सवरून मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटर रामचरित मानसमधील एक चौपाई लिहिली आहे आणि ते त्यांच्या शब्दांवर ठाम राहतील असे म्हटले आहे.किरोरी लाल मीना यांनी लिहिले की, 'रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए'. त्यामुळे आता या पोस्टवरू एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, दौसा येथील भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर किरोरीलाल मीना मंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात.
भाजप नेत्याने काय विधान केले होते?
राजस्थानमधील सात पैकी एकही जागा भाजपाने गमावली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे विधान दौसा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान कॅबिनेट मंत्री किरोरीलाल मीणा यांनी केले होते. या जागांमध्ये भरतपूर, ढोलपूर करौली, दौसा, अलवर, जयपूर ग्रामीण, टोंक सवाई माधोपूर, कोटा बुंदी यांचा समावेश आहे. दरम्यान, मतमोजणीच्या कलांनुसार यापैकी अनेक जागांवर भाजपचा पराभव होत आहे.