अमेठीत कोंडी करण्याचे भाजपचे डावपेच राहुल गांधींनी उधळले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 05:58 AM2019-05-13T05:58:58+5:302019-05-13T06:00:05+5:30

अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती इराणी लढत आहेत.

 Rahul Gandhi tears up the BJP's tactic in Amethi | अमेठीत कोंडी करण्याचे भाजपचे डावपेच राहुल गांधींनी उधळले

अमेठीत कोंडी करण्याचे भाजपचे डावपेच राहुल गांधींनी उधळले

Next

- हरिश गुप्ता

अमेठी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमध्ये पराभव व्हावा म्हणून भाजपने जंगजंग पछाडले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ व पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा या मतदारसंघात झाल्या. पण भाजपच्या या डावपेचांवर मात करण्यात राहुल गांधी यशस्वी झाले आहेत.
अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती इराणी लढत आहेत. इराणी यांना उत्तर प्रदेशच्या सरकारी यंत्रणेचेही मोठे पाठबळ लाभले आहे. भाजपव्यतिरिक्त इतर पक्षांच्या लखनौऊ वा अन्य राज्यांतून आलेल्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे.
‘चौकीदार चोर है' असा घणाघात राहुल गांधी यांनी केल्यामुळे त्यांच्यावर नरेंद्र मोदी संतापले आहेत. या प्रचारामुळे भाजप चिंताग्रस्तही झाला आहे. गुजरात विधानसभेत काँग्रेसला सत्ता मिळता मिळता राहिली. मध्य प्रदेश, राजस्थान, विधानसभेत काँग्रेसने भाजपचा पराभव केला. राहुल यांनी कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण केला तर प्रियांका यांनीही प्रचारात चैतन्यही आणले.
अमेठीबरोबरच राहुल यांनी केरळच्या वायनाडमधूनही अर्ज भरुन त्यांना हरविण्याचे भाजपचे डावपेच उधळून लावले. प्रियांका यांनी अमेठीत पाच दिवसांच्या दौरा करून मोदी सरकारवर कडक टीका केली. राहुल यांनीही अमेठीचा पाच दिवसांचा दौरा केला. याआधी गांधी घराण्यातील कोणाही व्यक्तीने निवडणूक काळात एकाच मतदारसंघात इतक्या दिवसांचा दौरा केला नव्हता.



मोदींकडून विद्वेषी प्रचार - राहुल गांधी
नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अजय माकन उभे असून तेथील मतदानकेंद्रात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी मतदान केले. राहुल गांधी यांनी मतदानानंतर केलेल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, लोकशाही वाचविण्यासाठी आमचा संघर्ष सुरू असून त्यादृष्टीने या लोकसभा निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. देशहित लक्षात घेऊनच मी आज मतदान केले आहे. बेरोजगारी, शेतीचे गंभीर बनलेले प्रश्न, नोटाबंदी, राफेल खरेदी व्यवहारातील घोटाळा या प्रश्नांवर विरोधकांनी आवाज उठविला आहे. मोदींनी मात्र विद्वेषी प्रचार चालविला आहे. आम्ही मात्र मत्सरावर प्रेमानेच मात करू.



अखिलेश यांचे आवाहन : राहुल गांधी यांनाच मतदान करा असे आव्हान करण्याची विनंती काँग्रेसतर्फे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना करण्यात आली होती. अमेठी व रायबरेलीमध्ये काँग्रेस उमेदवारालाच मतदान करावे असा आदेश मायावतींनी बसपच्या कार्यकर्त्यांना दिला होता. याबद्दल या दोन्ही नेत्यांचे राहुल गांधी यांनी आभार मानल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title:  Rahul Gandhi tears up the BJP's tactic in Amethi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.