वायनाडमधील भूस्खलन प्रकरणी मदतनिधीवरून प्रियांका गांधींची केंद्रावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 07:13 IST2024-12-15T07:12:13+5:302024-12-15T07:13:21+5:30
भूस्खलनग्रस्त वायनाडसाठी केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी संसद परिसरात प्रियांका गांधी व केरळ राज्यातील इतर काँग्रेस खासदारांनी निदर्शने केली.

वायनाडमधील भूस्खलन प्रकरणी मदतनिधीवरून प्रियांका गांधींची केंद्रावर टीका
नवी दिल्ली :वायनाडमधील भूस्खलन ग्रस्तांना मदत करण्याऐवजी राजकारण केले जात असल्याचा आरोप शनिवारी काँग्रेसच्या खा. प्रियांका गांधी यांनी केला. आपत्तीच्या वेळी कोणताही भेदभाव करू नये असे नमूद करत वायनाडसाठी मदतनिधी देण्याची मागणी त्यांनी केली.
भूस्खलनग्रस्त वायनाडसाठी केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी संसद परिसरात वायनाडच्या खा. प्रियांका गांधी व केरळ राज्यातील इतर काँग्रेस खासदारांनी निदर्शने केली. हिमाचल प्रदेशातही आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
खासदारांचे आंदोलन
या निदर्शनादरम्यान संसद भवनच्या मकरद्वारासमोर एकत्र जमलेल्या खासदारांनी वायनाडसोबतचा भेदभाव बंद करा, अशा घोषणा दिल्या. वायनाडला न्याय द्या, वायनाडसाठी मदत निधी द्या, या आशयाचे फलक खासदारांनी हातात धरले होते
सरकार वायनाडला विशेष पॅकेज द्यायचे टाळत आहे. मदतनिधी मिळावा म्हणून गृहमंत्री अमित शहांना विनंती केली. पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले असल्याचा दावा निदर्शनादरम्यान माध्यमांशी बोलताना प्रियांका गांधींनी केला.