खासदारकीसाठी आमदारांना पक्षांनी दिली अधिक पसंती; १४ जागा, ७ विधानसभा सदस्य रिंगणात

By किरण अग्रवाल | Published: April 14, 2024 08:30 AM2024-04-14T08:30:43+5:302024-04-14T08:31:05+5:30

१४ जागांसाठी ७ विधानसभा सदस्य रिंगणात असून अन्यही काही ‘रेस’मध्ये आहेत. 

Parties gave more preference to MLAs for MP 14 seats, 7 assembly members in fray | खासदारकीसाठी आमदारांना पक्षांनी दिली अधिक पसंती; १४ जागा, ७ विधानसभा सदस्य रिंगणात

खासदारकीसाठी आमदारांना पक्षांनी दिली अधिक पसंती; १४ जागा, ७ विधानसभा सदस्य रिंगणात

रांची: लोकसभेच्या अवघ्या १४ जागा असलेल्या झारखंडमध्ये विद्यमान खासदारांचे मोठ्या प्रमाणात पत्ते कापले गेले असून, आतापर्यंत ७ आमदारांवर विश्वास व्यक्त करत त्यांना खासदारकीची तिकिटे दिली गेली आहेत. एकूण जागांच्या तुलनेत या राज्यात सर्वाधिक आमदार यंदा लोकसभेत ‘प्रमोशन’साठी नशीब आजमावणार असल्याचे चित्र समोर आले आहे. 

चेहरे बदलण्याची स्पर्धा
झारखंडमध्ये यंदा सर्वच पक्षांमध्ये ‘चेहरे’ बदलण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. या राज्यात भाजपाने तीन, झारखंड मुक्ती मोर्चाने दोन तर काँग्रेस व भाकपाने प्रत्येकी एका आमदाराला आतापर्यंत लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे. 

तिकिटासाठी इकडून तिकडे
महाविकास आघाडीमध्ये चतरा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने लढवावा की राजदने, याबद्दल फैसला बाकी आहे. भाजपाचे आमदार गिरीनाथ सिंह यांनी येथील तिकिटासाठी राजदमध्ये प्रवेश केला आहे. राज्यात अन्य जागांसाठीही  ५ ते ६ आमदार प्रयत्नशील आहेत. त्यांना तिकिटे मिळाली तर खासदारकीची निवडणूक लढणाऱ्या आमदारांची संख्या आणखी वाढेल. 

काँग्रेसचे चौघे प्रयत्नशील... 
धनबादमध्ये भाजपाने विद्यमान खासदार पी. एन. सिंह यांचे तिकीट कापून आमदार ढुलू महतो यांना उमेदवारी दिल्याने तेथे काँग्रेसतर्फे पूर्णिमा नीरज व अनुप सिंह हे दोन आमदार तिकिटासाठी स्पर्धेत आहेत. गोड्डाच्या जागेवरही काँग्रेसचे आमदार प्रदीप यादव व दीपिका पांडेय यांनी दावेदारी केली आहे.

दोघांत दोघे आमदार आमनेसामने... 
हजारीबागमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले  जयंत सिन्हा यांचे तिकीट कापून भाजपाने आमदार मनीष जयस्वाल यांना रिंगणात उतरवले आहे; तर महाआघाडीने भाजपा सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या आमदार जयप्रकाशभाई पटेल यांना त्यांच्यासमोर उभे केल्याने सामना उत्कंठावर्धक होणार आहे. 
दुमका येथे झामुमो सोडून आलेल्या सोरेन कुटुंबातील मोठ्या सूनबाई आमदार सीता सोरेन यांना भाजपाने तिकीट दिले असून, झामुमोने त्यांच्यासमोर त्यांचे काका आमदार नलिन सोरेन यांना रिंगणात उतरवून निवडणुकीत रंग भरला आहे. 

तिकिटासाठी पक्ष सोडला, पण...
- पाच टर्म खासदार राहिलेले भाजपाचे रामटहल चौधरी व आमदार जयप्रकाशभाई पटेल यांनी लोकसभेच्या तिकिटासाठी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये तर आमदार गिरीनाथ सिंह यांनी ‘राजद’मध्ये प्रवेश केला आहे.
- यापैकी फक्त पटेल यांनाच तिकीट मिळाले आहे. रांचीच्या जागेवर काँग्रेसतर्फे चौधरी यांनी दावेदारी केली आहे. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुबोधकांत सहाय तेथे अगोदरपासून दावेदार असल्याने निर्णय प्रलंबित आहे.

Web Title: Parties gave more preference to MLAs for MP 14 seats, 7 assembly members in fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.