"तुम्ही तुमच्या अर्थसंकल्पिय भाषणांमध्ये सर्व राज्यांची नावं घेतली होती का?"; खर्गेंच्या आरोपांवर निर्मला सीतारमन भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 13:42 IST2024-07-24T13:41:37+5:302024-07-24T13:42:05+5:30
"जर अर्थसंकल्पादरम्यान एखाद्या राज्याचे नाव आले नाही, तर त्या राज्यासाठी भारत सरकारच्या योजना नाहीत, असा अर्थ होतो का? आमच्या राज्यांना काहीच दिलेनाही असे म्हणत काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे. हा एक अपमानकारक आरोप आहे."

"तुम्ही तुमच्या अर्थसंकल्पिय भाषणांमध्ये सर्व राज्यांची नावं घेतली होती का?"; खर्गेंच्या आरोपांवर निर्मला सीतारमन भडकल्या
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. विरोधी पक्षाचे खासदार संसदेत अर्थसंकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. अर्थसंकल्पात विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांवर अन्याय केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यातच, खर्गे यांनीही केंद्रावर निशाणा साधला आहे. खर्गेंनी केलेल्या आरोपांना निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेच्या कामकाजादरम्यान सडेतोड उत्तर दिले आहे.
सीतारमन म्हण्याल्या, 'आपल्याला प्रत्येक अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचे नाव घेण्याएवढा वेळ मिळत नाही. कॅबिनेटने वडावनमध्ये एक पोर्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कालच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राचे नाव मिळाले नाही. याचा अर्थ असा काढायचा का की आम्ही महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले.' एवढेच नाही तर, काँग्रेसने आपल्या अर्थसंकल्पात सर्व राज्यांची नावे घेतली होती का? असा सवालही यावेळी सीतारमन यांनी विरोधकांना केला.
जर अर्थसंकल्पादरम्यान एखाद्या राज्याचे नाव आले नाही, तर त्या राज्यासाठी भारत सरकारच्या योजना नाहीत, असा अर्थ होतो का? आमच्या राज्यांना काहीच दिलेनाही असे म्हणत काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे. हा एक अपमानकारक आरोप आहे.
काय म्हणाले होते खर्गे? -
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. हा अर्थसंकल्प दिशाभूल करणारा असून यात केवळ भाजपच्या मित्रपक्षांसाठीच घोषणा करण्यात आल्या आहेत. कुणाला काहीही मिळाले नाही. हे सर्व खुर्ची वाचवण्यासाठी झाले आहे. आम्ही या अर्थसंकल्पाला विरोध करतो. याविरोधात आमची आघाडी निदर्शन करेल. असे खर्गे यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, संतुलन नसेल तर विकास कसा होणार? असासवालही त्यांनी केला.