कोणालाही काहीही न सांगता घरातून गेली; दुसऱ्या दिवशी नदीत आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:36 IST2025-12-31T17:35:02+5:302025-12-31T17:36:40+5:30
Darbhanga Student Death News: कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा दुसऱ्या दिवशी गावातील नदीत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली.

कोणालाही काहीही न सांगता घरातून गेली; दुसऱ्या दिवशी नदीत आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा दुसऱ्या दिवशी गावातील नदीत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी डीएमसीएच रुग्णालयात पाठवला आहे. अभ्यासावरून आई ओरडली म्हणून संबंधित मुलगी घरातून निघून गेली होती, असा दावा कुटुंबियांकडून केला जात आहे. याप्रकरणी आत्महत्येची नोंद करून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले.
मृत मुलगी दरभंगाच्या रत्नोपट्टी परिसरात राहत असून इयत्ता अकरावीत शिकत होती. दरम्यान, २६ डिसेंबर रोजी अभ्यावरून आई तिला ओरडली. त्यानंतर ती कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. परंतु, रात्री उशीर होऊनही मुलगी घरी न परतल्याने हवालदिल झालेल्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी शहरातील विविध भागांतील सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामध्ये २७ डिसेंबर रोजी राजनंदिनी एकटी फिरताना दिसली, मात्र त्यानंतरच्या फुटेजमध्ये ती कोठेही दिसली नाही. अखेर दुसऱ्या दिवशी बाजितपूर परिसरातील बागमती नदीत स्थानिक रहिवाशांना एक मृतदेह तरंगताना दिसला.
एका मुलीचा मृतदेह सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नदीकाठावर शेकडो नागरिकांनी गर्दी केली. शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह नदीबाहेर काढला. मुलीचे वडील अर्जुन साह यांनी मृतदेहाची ओळख पटवली. मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने आत्महत्या केल्याचे वाटत आहे. आईशी झालेल्या वादाचा उल्लेख एफआयआरमध्येही आहे. मात्र, कुटुंबीयांनी काही इतर शंकाही व्यक्त केल्या आहेत. मृत्युचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.