Guwahati Fire: गुवाहाटीत एकामागून एक १५ सिलेंडरचे स्फोट; २५ हून अधिक घरे जळून खाक, बचाव कार्य सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 23:34 IST2022-12-09T23:34:06+5:302022-12-09T23:34:58+5:30
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दखल घेत तातडीने मदतकार्य पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.

Guwahati Fire: गुवाहाटीत एकामागून एक १५ सिलेंडरचे स्फोट; २५ हून अधिक घरे जळून खाक, बचाव कार्य सुरु
गुवाहाटी: गुवाहाटीत असलेल्या आमबारी परिसरात शुक्रवारी रात्री एकमागून एक १५ सिलेंडरचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. यामुळे लागलेल्या मोठ्या प्रमाणावर आग लागली. या आगीत २५ हून अधिक घरे जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या २० गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जीएमसी कॉलनीत आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सुमारे २० बंब घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या लागलेल्या आगीदरम्यान सुमारे १५ सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने आणखी भीषण रूप धारण केले. आग आटोक्यात येईपर्यंत २५ हून अधिक घरे पूर्णपणे जळून खाक झाली होती. या परिसरात ७० कुटुंबे राहत होती.
मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश
आग कशी लागली हे कळू शकले नाही. शॉर्टसर्किट किंवा किचनमधून आग लागली असावी, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे तसेच बाधितांना अन्न आणि निवारा यासह अन्य वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी दोन मंत्रीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. गुवाहाटीचे पोलिस आयुक्तही घटनास्थळी पोहोचले आहेत.
दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून नुकसानीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"