मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:56 IST2026-01-14T17:53:19+5:302026-01-14T17:56:23+5:30
Makar Sankranti: मकरसंक्रांतीनिमित्त आपली मुलगी हॉस्टेलमधून घरी आणण्यासाठी दुचाकीने जात होते.

मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Makar Sankranti: दरवर्षी मकर संक्रांतीदरम्यान नायलॉन मांजामुळे अनेक गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारचा अपघात कर्नाटकात घडला आहे. बिदर जिल्ह्यात पतंग उडवण्यासाठी वापरण्यात आलेल्या चायनीज मांज्यामुळे दुचाकीस्वाराचा गळा कापला गेला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चितगुप्पा तालुक्यातील तालामडगी गावाजवळ घडली. संजय कुमार होसानमणी (वय 48) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते बिदर तालुक्यातील बंबुळगी गावचे रहिवासी होते. संजय कुमार मकरसंक्रांतीनिमित्त आपली मुलगी हॉस्टेलमधून घरी आणण्यासाठी हुमनाबाद येथे दुचाकीने जात होते. यादरम्यान, अचानक त्यांच्या गळ्यात चायनीज मांजा अडकून गळा गंभीररीत्या कापला गेला.
वाटेतच काळाने घाला घातला...
मांजामुळे गळा कापल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मन्नेकळ्ळी सरकारी रुग्णालयाच्या शवागृहात पाठवण्यात आला आहे. ही घटना मन्नेकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बंदी घातलेला मांजा नेमका कुठून आला, याचा शोध घेतला जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात चायनीज मांज्याविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. तरीही काही दुकानांमध्ये हा बंदी घातलेला मांजा विकला जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने काही ठिकाणी मांजा जप्त केला असून, हा मांजा विकणाऱ्या किंवा वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.