ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 11:57 IST2025-09-16T11:55:51+5:302025-09-16T11:57:17+5:30
इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने ऑनलाइन गेममध्ये मोठी रक्कम गमावल्यामुळे आत्महत्या केली.

ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
लखनऊच्या मोहनलालगंज भागात एक धक्कादायक घटना घडली. बीआयपीएस शाळेत शिकणाऱ्या एका सहावीच्या विद्यार्थ्याने, ऑनलाइन गेममध्ये मोठी रक्कम गमावल्यामुळे आत्महत्या केली. यश कुमार (वय, १२) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
यशचे वडील सुरेश कुमार यादव यांनी दोन वर्षांपूर्वी आपली जमीन विकून मिळालेले १३ लाख रुपये बँकेत जमा केले. सोमवारी पासबुक अपडेट केल्यानंतर त्यांना ही रक्कम खात्यातून गायब झाल्याचे लक्षात आले. चौकशी केली असता, ही सर्व रक्कम 'फ्री फायर' या ऑनलाइन गेमवर खर्च झाल्याचे समोर आले. घरी परतल्यावर सुरेश यांनी यशला याबद्दल विचारले. सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर, यशने सर्व पैसे गेममध्ये गमावल्याचे कबूल केले.
यश हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पैसे गमावल्याचे कळल्यानंतरही वडिलांनी त्याला कठोर शिक्षा केली नाही, उलट शांतपणे समजावून सांगितले. त्यांच्या शिकवणी शिक्षकानेही त्याला समजावण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर काही वेळाने यश आपल्या खोलीत गेला आणि त्याने पंख्याला गळफास लावून घेतला.
कुटुंबीयांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. यशच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. यशच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याची आई विमला बेशुद्ध पडली, तर बहिणीलाही मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.