राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 15:02 IST2024-05-19T15:01:30+5:302024-05-19T15:02:49+5:30
Lok Sabha Elections 2024: या गोंधळामुळे दोन्ही नेत्यांना भाषण करता आले नाही.

राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या विविध ठिकाणी प्रचारसभा होत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सभेत मोठा गदारोळ झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि स्टेजभोवती लावलेले बॅरिकेड्स तोडले. यामुळे चेंगराचेंगरीसारखे वातावरण पाहायला मिळाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल आणि अखिलेश यांची संयुक्त जाहीर सभा होणार होती. राहुल-अखिलेश येताच कार्यकर्ते अचानक अनियंत्रित झाले आणि स्टेजवर पोहोचले. हा गोंधळ इतका प्रचंड होता की दोन्ही नेते भाषण न करता तेथून निघून गेले. या गोंधळात अनेक जण जखमीही झाले आहेत. या गोंधळाचे नेमके कारण समजू शकले नाही. सध्या पोलीस या जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी रांचीमध्येही I.N.D.I.A. आघाडी सभेत गदारोळ झाला होता.
अलाहाबादमध्ये काँग्रेस, तर फुलपूरमध्ये सपाचा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दोघांच्या समर्थनार्थ ही संयुक्त रॅली काढण्यात आली होती.