रांचीमध्ये ‘इंडिया’च्या सभेत कार्यकर्ते भिडले; एकमेकांना फेकून मारल्या खुर्च्या, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 09:33 AM2024-04-22T09:33:39+5:302024-04-22T09:36:08+5:30

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, विरोधी पक्षांचं ऐक्य दाखवण्यासाठी रविवारी इंडिया आघाडीची (INDIA Opposition Alliance) उलगुलान सभा झारखंडमधील रांची येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा विरोधी पक्षांच्या ऐक्यापेक्षा इंडिया आघाडीतील घटक पक्षामधील हाणामारीमुळेच अधिक चर्चेत आली आहे.

Lok Sabha Election 2024: Activists clash at 'INDIA' meeting in Ranchi; Throwing chairs at each other, the reason that came to the fore | रांचीमध्ये ‘इंडिया’च्या सभेत कार्यकर्ते भिडले; एकमेकांना फेकून मारल्या खुर्च्या, समोर आलं असं कारण

रांचीमध्ये ‘इंडिया’च्या सभेत कार्यकर्ते भिडले; एकमेकांना फेकून मारल्या खुर्च्या, समोर आलं असं कारण

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, विरोधी पक्षांचं ऐक्य दाखवण्यासाठी रविवारी इंडिया आघाडीची उलगुलान सभा झारखंडमधील रांची येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा विरोधी पक्षांच्या ऐक्यापेक्षा इंडिया आघाडीतील घटक पक्षामधील हाणामारीमुळेच अधिक चर्चेत आली आहे. या सभेमध्ये झारखंडमधील चतरा लोकसभा मतदारसंघातील के. एन. त्रिपाठी यांच्या उमेदवारीवरून आरजेडी आणि काँग्रेसचे समर्थक आमने-सामने आले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. तसेच खुर्च्यांची फेकाफेकी आणि धक्काबुक्कीमध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले. 

चतरा लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने के.एन. त्रिपाठी यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला सभेदरम्यान आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. हळूहळू प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. तसेच दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत काँग्रेस उमेदवाराच्या भावाच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच इतर ३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, एकीकडे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू असताना दुसरीकडे मंचावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांची भाषणं मात्र सुरू होती. या सभेमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, आरजेडीचे नेत तेजस्वी यादव, हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन, अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनिता केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी नेत्यांनी यावेळी भाषणं दिली.

दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार के. एन. त्रिपाठी यांच्याविरोधात काँग्रेसच्या कार्यालयामध्ये खूप नाराजी दिसून आली. त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेवरून भाजपा नेते बिरंची नारायण यांनी इंडिया आघाडीला टोला लगावला आहे. सिनेमा येण्यापूर्वीचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. या आघाडीचं चरित्र लोकांनी पाहिलं आहे. त्यात सगळे विदूषक भरलेले आहेत. या आघाडीच्या माध्यमातून झारखंडमधील जनतेचं कल्याण होणार नाही.   

Web Title: Lok Sabha Election 2024: Activists clash at 'INDIA' meeting in Ranchi; Throwing chairs at each other, the reason that came to the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.