Lakhimpur Protest : लखीमपुरात शेतकरी-सरकार संघर्ष पेटला, प्रियंका गांधींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 10:11 IST2021-10-04T10:08:50+5:302021-10-04T10:11:33+5:30
केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

Lakhimpur Protest : लखीमपुरात शेतकरी-सरकार संघर्ष पेटला, प्रियंका गांधींना अटक
नवी दिल्ली - वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीतील सीमांवर आंदोलन सुरू आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही शेतकरी जखमी झाले आहेत. त्यामुळे, येथील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधींना पोलिसांनी अटक केल्याचे माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता, युपीतील लखीमपूर येथील शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. आंदोलन थोपवता आले नाही, म्हणून आता शेतकऱ्यांनाच चिरडून टाकले. या नरसंहारावर जी लोक मूग गिळून गप्प बसलीत, त्यांनी या कालचक्राचा फेरा कायम स्मरणात ठेवावा, त्यांनाही अशाच प्रकारे एक दिवस निशाण्यावर घेतले जाईल. या प्रकरणाला सरळपणे पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी जबाबदार आहेत, या शब्दांत युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी. यांनी हल्लाबोल केला.
Youth Congress National President Srinivas BV claims "Priyanka Gandhi Vadra arrested from Hargaon." pic.twitter.com/PzmLiEUvUI
— ANI UP (@ANINewsUP) October 4, 2021
तसेच, शेवटी तेच झालं जे वाटत होतं, महात्मा गांधींच्या लोकशाही देशात गोडसेंच्या भक्तांनी, मोठ्या पावसात आणि पोलिसांशी संघर्ष करत शेतकऱ्यांच्या भेटीस निघालेल्या आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांना हरगाव येथून अटक केली, असेही श्रीनिवास यांनी म्हटले आहे. श्रीनिवास यांच्या या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे.
'मैं उन लोगों से Important नही हूँ, जिनको तुम लोगों ने गाड़ी के नीचे कुचलकर मारा है'~ @priyankagandhi#लखीमपुर_किसान_नरसंहारpic.twitter.com/Q3BEC8ZpyR
— Srinivas BV (@srinivasiyc) October 4, 2021
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी यांच्याविरोधात लखीमपूर खिरी जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र, या आंदोलनात एक कार घुसली आणि यामध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर आठ शेतकरी जखमी झाले. दुसरीकडे भारतीय किसान युनियन यांनी दावा केला आहे की, या दुर्घटनेत ३ शेतकरी मारले गेले आहेत. शेतकरी आंदोलनानंतर परतत असताना त्यांच्यावर वाहनाने हल्ला करण्यात आला, असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे.
आम आदमी पक्षाचाही हल्लाबोल
या प्रकारानंतर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेची अशी नशा, धुंदी आजपर्यंत कुणी पाहिली नसेल किंवा ऐकीवात नसेल. आंदोलक शेतकऱ्यांवर मंत्र्याच्या मुलाने कार चढवली. यामध्ये तीन आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी. गुन्हेगारांना अटक करून सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी. कुटुंबांना नुकसानभरपाई द्या, अशी मागणी सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.