आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या उमेदवारीला INDIA आघाडीतून विरोध; CPI ची वेगळी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 09:44 PM2024-01-03T21:44:49+5:302024-01-03T21:46:14+5:30

राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवू नये, अशी मागणी काँग्रेसचा मित्रपक्ष सीपीआयने केली आहे.

INDIA alliance Opposition to Rahul Gandhi's candidature from INDIA Alliance; CPI has made a big demand | आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या उमेदवारीला INDIA आघाडीतून विरोध; CPI ची वेगळी भूमिका

आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या उमेदवारीला INDIA आघाडीतून विरोध; CPI ची वेगळी भूमिका

Lok Sabha Election 2024: येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण, काँग्रेस अडचणीत आली आहे. या अडचणीचे कारण दुसरे काही नसून राहुल गांधी यांचा वायनाड लोकसभा मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना ही जागा सोडावी लागू शकते. याचे कारण म्हणजे, इंडिया आघाडीचा भाग असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) राहुल गांधींच्या उमेदवारीला विरोध केला आहे. 

राहुल गांधींना मित्रपक्षाकडून विरोध
सीपीआयच्या सूत्र्यांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येतोय की, राहुल गांधींना 2024 ची लोकसभा निवडणूक वायनाड मतदारसंघातून लढवू नये, अशी सीपीआयची इच्छा आहे. हा सीपीआयचा पारंपारिक मतदारसंघ आहे, असे सीपीआयचे मत आहे. राहुल गांधींनी वायनाडमधून निवडणूक लढवली तर आघाडीसाठी योग्य ठरणार नाही, असा स्पष्ट संदेश सीपीआयकडून काँग्रेसला देण्यात आला आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी दुसरा मतदारसंघ निवडावा असे पक्षाचे म्हणने आहे. विशेष म्हणजे, सीपीआयने राहुल गांधींना फक्त वायनाड नाही, तर केरळच्या कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू नये, असे म्हटले आहे. 

राहुल गांधींनी दुसऱ्या राज्यातून लढावे
ज्या राज्यात काँग्रेसची भाजपशी थेट लढत आहे, अशा राज्यातून राहुल यांनी लढावे, असे सीपीआयचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये सीपीआयने काँग्रेससमोर ज्या अटी ठेवल्या, त्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही पाठिंबा देत आहे. म्हणजेच राहुल यांना वायनाडमधून हटवण्यासाठी केरळमध्ये काँग्रेसवर सर्व बाजूंनी दबाव आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला केरळमध्ये आपली आघाडी वाचवायची असेल, तर राहुल गांधींना केरळमधून बाहेर पडावे लागेल. आता यात किती तथ्य आहे आणि राहुल गांधी काय निर्णय घेतात, हे येणाऱ्या काळात कळेल. 

वायनाडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी वायनाडमध्ये चार लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे एमआय शानवास यांनी सीपीआयच्या सत्यन मोकेरी यांचा सुमारे 20 हजार मतांनी पराभव केला होता. 2009 च्या निवडणुकीतही एम शानवास यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2019 मध्ये काँग्रेसने केरळमध्ये 16 पैकी 15 जागा जिंकल्या होत्या. त्यांच्या विजयामागे वायनाडमधून राहुल गांधींची लढत महत्त्वाची होती. अशा परिस्थितीत काँग्रेस सीपीआयपुढे झुकल्यास काँग्रेसचेच मोठे नुकसान होऊ शकते. 

Web Title: INDIA alliance Opposition to Rahul Gandhi's candidature from INDIA Alliance; CPI has made a big demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.