Hundreds Cheer As PM Modi Visits Varanasi To Say 'Thank You' | लोकसभेतील विजयानंतर नरेंद्र मोदींची वाराणसीत धन्यवाद रॅली

लोकसभेतील विजयानंतर नरेंद्र मोदींची वाराणसीत धन्यवाद रॅली

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी (27 मे) मोदी पहिल्यांदाच आपला मतदारसंघ वाराणसीत पोहोचले आहेत.शपथविधी होण्याआधीच नरेंद्र मोदी मतदारांचे आभार मानण्यासाठी वाराणसीत दाखल झाले आहेत. वाराणसीत धन्यवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - भारतातील मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल दिला. मोदींच्या झंझावातात, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी (27 मे) मोदी पहिल्यांदाच आपला मतदारसंघ वाराणसीत पोहोचले आहेत. शपथविधी होण्याआधीच नरेंद्र मोदी मतदारांचे आभार मानण्यासाठी वाराणसीत दाखल झाले आहेत. वाराणसीत धन्यवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र सजावट करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी बाबा विश्वनाथ आणि कालभैरवाचं दर्शन घेणार आहेत. 

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मतदारांचे आभार मानण्यासाठी नरेंद्र मोदी वाराणसीत पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोदी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेणार आहेत. पोलीस लाईन ते विश्वनाथ मंदिरामधील सात किमीचं अंतर ते बंद गाडीतून पार करणार आहेत. हा एक रोड शो असून यानंतर नरेंद्र मोदी समर्थकांना संबोधित करणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील देदीप्यमान विजयानंतर नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. यावेळी मंत्र्यांच्या शपथविधीदेखील पार पडेल. भाजपा आणि एनडीएच्या खासदारांनी त्यांचे नेते म्हणून एकमुखानं मोदींची निवड केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला 303, तर एनडीएला 353 जागा मिळाल्या आहेत.


30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद नरेंद्र मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील, अशी माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनादेखील शपथ दिली जाईल. मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची नावं अद्याप जाहीर झालेली नाहीत. याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. भाजपाला सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळाल्यानं मित्रपक्षांना किती मंत्रिपदं दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 


गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 282 जागा मिळाल्या होत्या. तर एनडीएला एकूण 336 जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपा आणि एनडीएला मिळालेल्या जागांमध्ये वाढ झाली. भाजपाच्या 21, तर एनडीएच्या 17 जागा वाढल्या आहेत. एनडीएच्या बैठकीत मोदींची एकमतानं निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व खासदारांना संबोधित केलं. कोणताही दुजाभाव न करता काम करण्याचा सल्ला त्यांनी खासदारांना दिला. अल्पसंख्याकांचा विश्वास जिंकण्यास प्राधान्य द्या, असं आवाहनदेखील त्यांनी केलं.

 

Web Title: Hundreds Cheer As PM Modi Visits Varanasi To Say 'Thank You'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.