Crime: युट्यूबवर व्हिडिओ पाहून दरोड्याचा कट, ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या, परिसरात खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 11:34 IST2025-12-05T11:33:23+5:302025-12-05T11:34:57+5:30
Ghaziabad Jeweler Murder: गाझियाबाद येथील मोदीनगरमध्ये दिवसाढवळ्या ७५ वर्षीय ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या करण्यात आली.

Crime: युट्यूबवर व्हिडिओ पाहून दरोड्याचा कट, ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या, परिसरात खळबळ!
गाझियाबाद येथील मोदीनगर परिसरात दिवसाढवळ्या ७५ वर्षीय ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी पाठलाग करून आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोराने ही क्रूर कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील रहिवासी आणि दुकानदारांच्या मनात भिती पसरली आहे.
पीडित गिरधारी लाल असे हत्या करण्यात आलेल्या ज्वेलर्सचे नाव असून त्यांचे मोदीनगर परिसरात गिरधारी लाल अँड सन्स ज्वेलरी नावाचे दुकान आहे. दरम्यान, गिरीधारी यांनी नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास दुकान उघडले. काही वेळातच आरोपी अंकित गुप्ता हा मंकी कॅप घालून त्यांच्या दुकानात घुसला आणि त्याने काउंटरवर चढून गिरीधारी यांच्यावर धारदार शस्त्राने १० पेक्षा जास्त वेळा वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गिरीधारी यांचा जागीच मृत्यू झाला.
खेळण्यातील बंदूक दाखवून पळ
गिरीधारी यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून रुपेंद्र सोनी याने दुकानात धाव घेतली आणि अंकितला पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याने खेळण्यातील बंदूक दाखवून तिथून पळ काढला. पण रुपेंद्रने त्याचा पाठलाग केला. परिसरातील इतर दुकानदारांच्या मदतीने दुकानापासून सुमारे २५-३० मीटर अंतरावर आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
युट्यूबवर व्हिडिओ पाहून दरोड्याचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंकित गुप्ता याच परिसरात राहत होता आणि त्याचे कुटुंब स्थलांतरित झाल्यापासून तो आर्थिक तणावाखाली होता. अंकितला माहिती होते की, गिरीधारी यांचे मोठे दागिन्यांचे व्यवसाय आहेत. त्याने सुमारे एक आठवडाभर दुकानाची रेकी केली होती आणि गुरुवारी सकाळी ग्राहक नसताना हल्ला करण्याचा कट रचला. आरोपीने ऑनलाईन चाकू खरेदी केला. महत्त्वाचे म्हणजे, हल्ल्यापूर्वीच्या पाच दिवसांत त्याने युट्यूबवर २५ हून अधिक दरोड्यांचे व्हिडिओ पाहिले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.