वडिलांनी मोबाइल वापरण्यास विरोध केला; दहावीतील तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 20:46 IST2024-01-14T20:45:46+5:302024-01-14T20:46:13+5:30
कृपांगी ही खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी ताबडतोब तिला खाली उतरवलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

वडिलांनी मोबाइल वापरण्यास विरोध केला; दहावीतील तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
अलीकडच्या काळात मोबाइल या उपकरणाने तरुणाईला प्रचंड भुरळ घातली आहे. मोबाइल वापराचं रुपांतर कधी व्यसनात होऊन जातं, हेदेखील अनेकदा काही तरुणांच्या लक्षात येत नाही. मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. तसंच कधीकधी पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाइलचा वापर करण्यापासून रोखल्याने दुर्दैवी घटनाही घडतात. अशीच एक घटना कोटा शहरात घडली असून वडिलांनी मोबाइल वापरू नको असं सांगितल्याचा राग आल्याने इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या तरुणीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. कृपांगी असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे.
मोबाइलच्या अतिवापरामुळे वडील रागावल्याने कृपांगी आपल्या खोलीत गेली. त्यानंतर तिची समजूत काढण्यासाठी थोड्या वेळाने आजी गेली आणि तिला मोठा धक्काच बसला. कारण कृपांगी ही खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी ताबडतोब तिला खाली उतरवलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तिच्या मृत्यूने कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कृपांगीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
'परीक्षा जवळ आल्याने मी तिला ओरडलो'
कृपांगी दहावी इयत्तेत शिकत असून तिची परीक्षा जवळ आल्याने अभ्यास करावा यासाठी मी तिच्यावर ओरडलो होतो. मात्र ती असं टोकाचं पाऊल उचलेल, याची थोडीही कल्पना आम्हाला नव्हती, असं कृपांगीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं आहे.