Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:10 IST2025-12-19T14:07:26+5:302025-12-19T14:10:51+5:30
Haryana Faridabad Shooter Rape: नेमबाजीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या एका २३ वर्षीय महिला शूटरवर हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याची संतापजनक घटना फरिदाबादमध्ये घडली.

Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
नेमबाजीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या एका २३ वर्षीय महिला शूटरवर हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याची संतापजनक घटना फरिदाबादमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे, ज्या मित्रांवर विश्वास ठेवून ही पीडिता हॉटेलमध्ये थांबली, त्यांनीच हा कट रचल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी फरिदाबाद पोलिसांनी पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
भिवानी येथील रहिवासी असलेली पीडित महिला शूटर आपल्या एका मैत्रिणीसोबत फरिदाबाद येथे आयोजित शूटिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी आली होती. स्पर्धा संपल्यानंतर दोन्ही मैत्रिणींना घरी परतण्यासाठी मेट्रो स्टेशनला जायचे होते. पीडितेच्या मैत्रिणीने गौरव नावाच्या एका मित्राला मेट्रो स्टेशनवर सोडण्यासाठी फोन केला. गौरव त्याचा मित्र सतेंद्र सोबत तिथे पोहोचला. मात्र, रात्री उशीर झाला असल्याचे सांगत गौरवने पीडितेला भिवानीला जाण्याऐवजी फरिदाबादमधील एका हॉटेलमध्ये थांबण्याचा आग्रह केला. उशिरा प्रवास करणे धोक्याचे ठरेल, असे तो म्हणाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. चौघांनी बराच वेळ एका खोलीत पार्टी केली. काही वेळाने पीडितेच्या मैत्रिणीने गौरवला काही सामान आणण्याच्या बहाण्याने हॉटेलबाहेर नेले. पीडित महिला शूटर खोलीत एकटीच असताना सतेंद्रने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.
धक्कादायक प्रकार घडल्यानंतर पीडितेने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. फरिदाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी गौरव आणि सतेंद्रला हॉटेलमधूनच अटक केली. पीडितेने आपल्या तक्रारीत गंभीर आरोप केला आहे की, तिच्या मैत्रिणीने या दोघांशी संगनमत करून हा कट रचला. तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.