बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 05:39 IST2025-07-24T05:39:42+5:302025-07-24T05:39:56+5:30
आजवर फसवणुकीचे अनेक नवनवीन फंडे आपण पाहिले आहेत; परंतु गाझियाबादमध्ये एकाने चक्क बनावट दूतावास उघडून घोळ केल्याचे उघड झाले आहे.

बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
नवी दिल्ली : आजवर फसवणुकीचे अनेक नवनवीन फंडे आपण पाहिले आहेत; परंतु गाझियाबादमध्ये एकाने चक्क बनावट दूतावास उघडून घोळ केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडून ४४ लाख रुपये, राजनैतिक पासपोर्ट, ३४ शिक्के, वाहने, पासपोर्ट, घड्याळे जप्त करण्यात आली आहेत.
हर्षवर्धन जैन असे त्याचे नाव असून, त्याला गजाआड करण्यात आले. त्याच्याकडून ४४ लाख रोख व अनेक देशांचे परकीय चलन जप्त केले. त्याच्या ताब्यातून राजनैतिक नंबरप्लेट असलेली चार वाहनेही जप्त केली आहेत. यात १८ राजनैतिक नंबरप्लेट व लहान देशांच्या १२ राजनैतिक पासपोर्टांचा समावेश आहे.
बनला होता राजदूत
भाड्याच्या घरात त्याने बनावट दूतावास उघडले होते. वेस्ट आर्क्टिका, साबोर्ग, पौलविया आणि लोडोनिया यांसारख्या देशांचे राजदूत असल्याचा बनावट दावा तो करीत होता.
फोटो मॉर्फ केले...
आपले पितळ उघडे पडू नये, यासाठी त्याने वाहनांवर राजनैतिक नंबर प्लेट्स वापरल्या. राष्ट्रपती, पंतप्रधान व इतर मान्यवरांबरोबर आपले संबंध आहेत, असे भासवण्यासाठी त्याने अनेक फोटो मॉर्फ केलेले आढळले.
नेमका उद्योग कोणता?
हा सर्व उपद्व्याप त्याने कंपन्या व व्यक्तींना परदेशात काम करण्याकरिता दलालीचे व्यवहार करण्यासाठी केले. तो बनावट कंपन्यांद्वारे हवाला रॅकेटही चालवतो, असे पोलिसांनी सांगितले.