लक्षद्वीपकडे वळले प्रत्येकाचे लक्ष! जगभरातून इंटरनेटवरील सर्चमध्ये ३००० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:41 PM2024-01-10T12:41:35+5:302024-01-10T12:43:06+5:30

लवकरच बांधणार नवे विमानतळ; निमुळते, छाेटे बेट, उतरतील माेठी विमाने

Everyone's attention turned to Lakshadweep! 3000 percent increase in worldwide internet searches | लक्षद्वीपकडे वळले प्रत्येकाचे लक्ष! जगभरातून इंटरनेटवरील सर्चमध्ये ३००० टक्के वाढ

लक्षद्वीपकडे वळले प्रत्येकाचे लक्ष! जगभरातून इंटरनेटवरील सर्चमध्ये ३००० टक्के वाढ

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर आता भारताने लक्षद्वीपमध्ये नवे विमानतळ बांधण्याची तयारी सुरू केली आहे. या विमानतळामुळे पर्यटकांचीही मोठी सोय होणार आहेच, शिवाय संरक्षणाच्या दृष्टिकोनातूनही तो महत्त्वाचा ठरणार आहे. मालदीवच्या मंत्र्यांच्या टिप्पणीनंतर ‘बाॅयकाॅट मालदीव’ची हाक भारतीयांनी दिली. त्यानंतर जगभरातील पर्यटकांच्या नजरा लक्षद्वीपकडे वळल्या. गेल्या २० वर्षांमध्ये कधी नव्हे एवढे इंटरनेटवर सर्च लक्षद्वीपबाबत करण्यात आले. तर नरेंद्र माेदी यांनी भेट दिल्यानंतर पर्यटनाशी संबंधित संकेतस्थळांवर लक्षद्वीपबाबत सर्चमध्ये ३००० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. नरेंद्र माेदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला भेट दिली हाेती. त्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी त्यासंदर्भात आक्षेपार्ह विधाने केली हाेती.

जायचे असेल तर आधी पाेलिसांची परवानगी घ्या

  • लाेकांनी इंटरनेटवर लक्षद्वीपमधील नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांची माहिती शाेधली. याशिवाय तेथे कसे जावे, ही माहितीही प्रामुख्याने नेटकऱ्यांनी जाणून घेतली. 
  • ३६ बेटांचा समावेश असलेला लक्षद्वीप द्वीपसमूह हा केंद्रशासित प्रदेश आहे.
  • स्थानिक आदिवासींच्या रक्षणासाठी १९६७मध्ये मंजूर झालेल्या कायद्यानुसार तेथे जाण्यासाठी परवाना घ्यावा लागताे. यातून काही जणांना सूट दिलेली आहे. 
  • विदेशी पर्यटकांना लक्षद्वीपमध्ये जाण्यासाठी वैध पासपाेर्ट आणि भारतात प्रवेशासाठी लागणारा व्हीसा आवश्यक आहे.


किती आहे परवाना शुल्क?

  • प्रत्येक अर्जदारासाठी ५० रुपये अर्जाचे शुल्क घेतले जाते.
  • १०० रुपये वारसा शुल्क १२ ते १८ वयाेगटातील मुलांसाठी लागते.
  • २०० रुपये वारसा शुल्क १८ वर्षांवरील लाेकांसाठी आहे.
  • याशिवाय भारतीय पर्यटकांना आपापल्या जिल्ह्यातून पाेलिस प्रमाणपत्रही सादर करावे लागते.


मालदीवच्या मंत्र्यांच्या टिप्पणीमुळे भारतातील पर्यटक नाराज झाले. त्यानंतर मालदीवला जाणाऱ्या सर्व उड्डाणांचे बुकिंग काही कंपन्यांनी तत्काळ थांबविले. लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध कंपन्यांनी नवे पॅकेजेस जाहीर केले आहेत.

निमुळते, छाेटे बेट; उतरतील माेठी विमाने

मालदीवसाेबत वादाला ताेंड फुटल्यानंतर भारत सरकारने लक्षद्वीपमधील मिनिकाॅय बेटावर नवे विमानतळ बांधण्याची तयारी सुरू केली आहे. या विमानतळावर प्रवासी तसेच लढाऊ विमानांसह इतर लष्करी विमानेदेखील उतरविता येतील, अशी याेजना सरकारने आखल्याचे सूत्रांनी सांगितले. या ठिकाणी नवे विमानतळ झाल्यास केवळ पर्यटन क्षेत्रच नव्हे तर अरबी आणि हिंदी महासागरावर पाळत ठेवणे भारताला शक्य हाेणार आहे. मिनिकाॅय येथे विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव भारतीय काेस्ट गार्डने सर्वप्रथम दिला हाेता. सध्याच्या प्रस्तावानुसार, भारतीय वायुसेना या ठिकाणी नेतृत्व करेल. सध्या अगात्ती येथेच एकेरी धावपट्टी असलेले विमानतळ आहे. या ठिकाणी विमाने उतरविण्यास बऱ्याच मर्यादा आहेत. मोठी विमाने तेथे उतरू शकत नाहीत.

Web Title: Everyone's attention turned to Lakshadweep! 3000 percent increase in worldwide internet searches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.