चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:01 IST2026-01-14T17:59:43+5:302026-01-14T18:01:20+5:30
Thief praying before stealing in Jhansi temple CCTV: उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये चोरीची एक अत्यंत अजब आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. गुन्हेगाराने चोरी तर केली, पण त्यापूर्वी त्याने जे केलं ते पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत!

चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यामध्ये चोरीची एक अत्यंत अनोखी आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. गरौठा पोलीस स्टेशन परिसरातील एका मंदिरात चोरी करण्यापूर्वी चोराने चक्क देवीची माफी मागितली आणि त्यानंतर डल्ला मारला. चोराची ही 'संस्कारी' कृती मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, या घटनेनंतर परिसरातील मंदिरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नेमकी घटना काय?
गरौठा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मदन रोडवरील 'बडी माता' मंदिरात ही घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास निळ्या रंगाची हुडी आणि टोपी घातलेला एक चोर मंदिरात शिरला. मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्याने आधी प्रत्येक मूर्तीची पाहणी केली. त्यानंतर त्याने देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने ओरबाडण्यास सुरुवात केली.
चोराचा भक्तीभाव पाहून पोलीसही चक्रावले
या चोरीतील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, चोरी केल्यानंतर पळून जाण्यापूर्वी या चोराने देवीच्या मूर्तीसमोर दोनदा हात जोडले. त्याने देवीसमोर मान झुकवून जणू काही केलेल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली आणि त्यानंतर तो दागिने घेऊन पसार झाला. गुन्हेगाराची ही विचित्र वागणूक पाहून तपासासाठी आलेले पोलीस अधिकारीही अवाक झाले आहेत.
यूपी | झांसी में एक चोर ने मंदिर में घुसकर देवी–देवताओं के जेवरात चुरा लिए। जाते–जाते हाथ जोड़कर प्रणाम करके भी गया। pic.twitter.com/KAF3kVLGco
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) January 12, 2026
सकाळी भाविक येताच चोरी उघड
नेहमीप्रमाणे सकाळी भाविक जेव्हा मंदिरात प्रार्थनेसाठी आले, तेव्हा त्यांना मंदिराचे कुलूप तुटलेले दिसले. गावकऱ्यांनी आत जाऊन पाहिले असता देवीचे सर्व दागिने गायब होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मंदिर परिसराचा पंचनामा केला.
पोलिसांकडून तपास सुरू
पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेज महत्त्वपूर्ण पुरावा ठरला आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून अज्ञात चोराची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. "आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा माग घेत आहोत. सर्व तांत्रिक बाजू तपासून लवकरच आरोपीला अटक केली जाईल," असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.