प्रेमासाठी तोडल्या धर्माच्या भिंती, हिंदु धर्म स्विकारत नाजनीनचे शुभ मंगल सावधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 13:48 IST2022-11-22T13:38:24+5:302022-11-22T13:48:16+5:30
मध्य प्रदेशच्या गुना येथील नाजनीन आणि दिपक गोस्वामी यांच्यात प्रेमसबंध जुळले होते.

प्रेमासाठी तोडल्या धर्माच्या भिंती, हिंदु धर्म स्विकारत नाजनीनचे शुभ मंगल सावधान
देशभरात सध्या श्रद्धा आणि आफताब यांच्या प्रेम प्रकरणावरुन पुन्हा एकदा लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. आफताबने श्रद्धाची निष्ठूरपणे हत्या केल्यामुळे याप्रकरणाला धार्मिक वळण दिले जात असल्याचेही दिसून येते. मात्र, मध्य प्रदेशमध्ये एका मुस्लीम मुलीने आपल्या प्रेमासाठी मुस्लीम धर्माचा त्याग करुन सनातन हिंदू धर्म स्विकारल्याचे समोर आले आहे. प्रेमासाठी वाट्टेल ते... म्हणत नाजनीन हिने प्रेमात जाती-धर्माच्या भींती ओलांडल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे तिने हिंदू विवाह पद्धतीने लग्नही केले.
मध्य प्रदेशच्या गुना येथील नाजनीन आणि दिपक गोस्वामी यांच्यात प्रेमसबंध जुळले होते. विशेष म्हणजे ४ वर्षांपूर्वी टीकटॉकवरुन ते एकमेकांना प्रथम भेटले. टिकटॉक भारतात बॅन झाले, पण या दोघांचे प्रेम अधिकच मजबूत होत गेले. ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. आपल्या प्रेमासाठी नाजनीनने मुस्लीम धर्म सोडून हिंदु धर्म स्विकारला. तर, नाजनीन हे नाव बदलून तिने आपले नाव नैनी असे ठेवले. नैनी आणि दिपक आता ७ जन्मांच्या बंधनात बांधले गेले आहेत.
मंदसौरच्या गायत्री मंदिरात दोघांनी विवाह केला असून सोशल मीडियावर या लग्नाचे फोटोही व्हायरल होत आहेत. या लग्नसोहळ्याला हिंदू धर्मगुरुही उपस्थित होते. विशेष म्हणजे गेल्या ६ महिन्यांत मंदसौर येथील मंदिरात धर्म परिवर्तन करुन लग्न करण्याची ही ५ वी घटना आहे. दिपक आणि नैनी यांनी पोलीस प्रशासनाला आपल्या सुरक्षेसाठी विनंती केली आहे. कारण, आपल्या कुटुंबासमवेत गुना जिल्ह्यातील कुंभराज येथेच दोघांनाही आपला संसार थाटायचा आहे. दरम्यान, २० मे रोजी दिपकच्या लग्नाची तारीख ठरली होती, पण नाजनीनने हिंदु धर्म स्विकारण्याचे कबुल केल्यानंतर दिपकनेही नाजनीनसोबतच लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला.