प्रियांका गांधींची खासदारकी धोक्यात? भाजप नेत्यानं घेतली उच्च न्यायालयात धाव, काय आहे संपूर्ण प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 14:59 IST2024-12-21T14:57:38+5:302024-12-21T14:59:13+5:30
नव्या हरिदास यांनी वायनाडमधून भाजपच्या तिकिटावर प्रियांका गांधी यांच्य विरोधात निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना प्रियंका गांधींकडून 5,12,399 मतांनी पराभव पत्करावा लागला.

प्रियांका गांधींची खासदारकी धोक्यात? भाजप नेत्यानं घेतली उच्च न्यायालयात धाव, काय आहे संपूर्ण प्रकरण?
कोची : वायनाड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, वायनाड लोकसभा जागेवरील पोटनिवडणुकीतील प्रियांका गांधी यांच्या विजयाला आव्हान देत भाजप नेत्या नव्या हरिदास यांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नव्या हरिदास यांनी वायनाडमधून भाजपच्या तिकिटावर प्रियांका गांधी यांच्य विरोधात निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना प्रियंका गांधींकडून 5,12,399 मतांनी पराभव पत्करावा लागला. दरम्यान, केरळ उच्च न्यायालयासमोरील आपल्या याचिकेत नव्या हरिदास यांनी असा युक्तिवाद केला आहे की, प्रियांका गांधींनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या विविध मालमत्तेची महत्त्वाची माहिती लपवली होती.
नव्या हरिदास यांच्या म्हणण्यानुसार, प्रियांका गांधींनी मतदारांची दिशाभूल केली, चुकीची माहिती दिली आणि त्यांच्या निवडीवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने मतदारांना अंधारात ठेवले. त्यांनी अनेक प्रसंगी मतदारांवर अनुचित प्रभाव टाकून कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.
प्रियांका गांधी यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी यांच्याकडे 4.24 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर 7.74 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय, पती रॉबर्ट वाड्रा यांच्या संपत्तीचा तपशीलही प्रियांका गांधी यांनी दिला आहे. वाड्रा यांच्याकडे एकूण 65.54 कोटी रुपयांची संपत्ती असून त्यापैकी जंगम मालमत्ता 37.9 कोटी रुपये आणि स्थावर मालमत्ता 27.64 कोटी रुपयांची आहे.