सत्कार करण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड, गर्दी पाहून हेमा मालिनी भडकल्या; कार्यक्रमस्थळी गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 18:48 IST2024-03-13T18:46:45+5:302024-03-13T18:48:13+5:30
या मतदारसंघातून हेमा मालिनी पराभूत होतील, अशा शब्दांत या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी मांडली.

सत्कार करण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड, गर्दी पाहून हेमा मालिनी भडकल्या; कार्यक्रमस्थळी गोंधळ
Hema Malini ( Marathi News ) : बॉलिवूड अभिनेत्री आणि मथुरा लोकसभा मतदारसंघातील खासदार हेमा मालिनी यांना भाजपने तिसऱ्यांदा तिकीट देत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. अशातच हेमा मालिनी यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिकीट जाहीर झाल्यानंतर हेमा यांचं अभिनंदन करण्यासाठी समर्थकांची झुंबड उडाली. मात्र कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची तुडुंब गर्दी बघून हेमा मालिनी या वैतागल्या आणि त्यांनी सत्कार करण्यास मनाई केली.
ज्यांचा सत्कार करण्यासाठी आपण जीवाचा आटापिटा केला त्यांनीच नाराजी दर्शवल्याने हेमा मालिनी यांचे समर्थक नाराज झाले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली. मात्र तरीही काही केल्यास कार्यकर्ते शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हते.
दरम्यान, या गोंधळानंतर पत्रकारांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी हे कुटुंबातील प्रकरण आहे, असं म्हणत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्कार नाकारल्याने ज्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला होता त्यांनी मात्र हेमा मालिनी यांच्यावर रोष व्यक्त केला. देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, मात्र या मतदारसंघातून हेमा मालिनी पराभूत होतील, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपली नाराजी मांडली.