अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 15:11 IST2024-04-29T15:07:55+5:302024-04-29T15:11:58+5:30
Pawan Singh Lok Sabha: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील नामांकित चेहरा अर्थात पवन सिंह हे लोकसभेच्या रिंगणात आहेत.

अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
Lok Sabha Elections 2024: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील नामांकित चेहरा अर्थात पवन सिंह हे लोकसभेच्या रिंगणात आहेत. ते अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावत आहेत. काराकाट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढत असलेले पवन सिंह हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून, चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. प्रचाराला आलेल्या पवन यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एका चाहत्याने हद्द पार केली. तो चक्क आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या वाहनावर चढला अन् सेल्फी घेतली. यामुळे पवन सिंह यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले.
पवन सिंह प्रचार करत असताना त्यांची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी खूप गर्दी केली. या गर्दीतील एक चाहता सेल्फी काढण्यासाठी पवन यांच्या वाहनाजवळ आला. बघता बघता त्याने वाहनावर जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता यावेळी झालेल्या झटापटीत पवन सिंह यांच्या महागड्या वाहनाचे नुकसान झाले. संबंधित चाहता काचेवर आदळल्याने ती फुटली, जे पाहून पवन सिंह यांनी डोक्याला हात लावला.
भाई नेताओं के साथ गलत तो होता है 🤣💀 pic.twitter.com/314R6fHfBB
— Raja Babu (@GaurangBhardwa1) April 29, 2024
भोजपुरी चित्रपटसृष्टीत पवन सिंह यांची भलतीच क्रेझ आहे. त्यांचा स्वॅग बॉलिवूडमधील भाईजान सलमान खानसारखा असल्याचे त्यांचे चाहते सांगतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. ते त्यांच्या कृतीमुळे आणि विधानांमुळे अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यांना त्यांची प्रसिद्धी आणि चाहत्यांचे प्रेम खासदार होण्याचा मान देते का हे चार जून रोजीच स्पष्ट होईल.