भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 10:45 IST2025-05-16T10:42:21+5:302025-05-16T10:45:23+5:30

धनमंडी परिसरातील एका मंदिरासमोर दोन गटांमध्ये तलवारबाजी झाल्याने बाजारात गोंधळ उडाला. तलवारबाजीनंतर तिथे जाळपोळीची घटनाही पाहायला मिळाली.

Argument over vegetables Two groups clashed in front of the temple in udaipur | भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

गुरुवारी संध्याकाळी उशिरा उदयपूर शहरातील धनमंडी पोलीस स्टेशन हद्दीतील संतोषी माता मंदिराजवळ तणाव निर्माण झाला. एका किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आणि त्याचे पर्यवसान हिंसक हल्ला व जाळपोळीमध्ये झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरासमोरील भाजी विक्रेता सत्यवीर आणि काही युवकांमध्ये भाजी खरेदीदरम्यान वाद झाला. याच दरम्यान एका युवकाने सत्यवीरच्या स्टॉलवर दगडफेक केली आणि पळ काढला. यानंतर सत्यवीरने थेट धनमंडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती.

रात्री साधारणपणे १० वाजण्याच्या सुमारास ४ ते ५ युवक तलवारी आणि काठ्या घेऊन सत्यवीरच्या स्टॉलवर पोहोचले आणि त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सत्यवीर गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने एमबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी वाढवला बंदोबस्त

या घटनेनंतर परिसरात प्रचंड गोंधळ उडाला आणि मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमले. याच दरम्यान काही संतप्त लोकांनी मंदिराजवळील भाजी विक्रेत्यांचे स्टॉल आणि दुकांनाना आग लावली. परिस्थितीच्या गांभीर्याचे भान ठेवत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बंदोबस्त वाढवला. वरिष्ठ पोलीस अधिकारी, एसपी योगेश गोयल स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

एसपी गोयल यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करताना सांगितले की, "सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यात येत असून, त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि समाजात शांतता टिकवून ठेवावी."

नागरिकांनी व्यक्त केला रोष

स्थानिक नागरिकांमध्ये घडलेल्या प्रकारामुळे चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांबाबत अनेकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. पोलिसांनी मात्र जनतेला सहकार्याची विनंती करत, कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर दिला आहे.

Web Title: Argument over vegetables Two groups clashed in front of the temple in udaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.