पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:47 IST2025-06-30T14:47:18+5:302025-06-30T14:47:47+5:30
एका कारमधून आलेल्या दोन तरुणांना पोलिसांना अडवल्याने, त्यांनी ताजमहलच्या परिसरात गोळीबार केला.

पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
सोमवारी सकाळी ताजमहालच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ थरारक घटना घडली. एका एर्टिगा कारमधून आलेल्या दोन तरुणांना पोलिसांना अडवल्याने, त्यांनी हवेत तीन राऊंड गोळीबार केला, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमरूद टीला येथील पोलीस बॅरियरजवळ एक कार प्रतिबंधित क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला.
सकाळी ९ वाजताच्या सुमारास, यूपी ८५ क्रमांकाची एक कार सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, कारमधील तरुणांनी प्रथम कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर त्यांनी गाडी वळवली आणि काही अंतरावर जाऊन हवेत तीन गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने घटनास्थळी उपस्थित पर्यटक आणि स्थानिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. गोळीबारानंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले.
आरोपींची ओळख पटवली
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. तात्काळ घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून, कारच्या नंबरवरून आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. मथुरा पोलिसांशी संपर्क साधून आरोपींचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!
या घटनेमुळे ताजमहालसारख्या जगप्रसिद्ध आणि संवेदनशील ठिकाणाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डीसीपी सिटी सोनम कुमार यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, आरोपींना लवकरच अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे म्हटले. काही सुरक्षा कर्मचारी कर्तव्यावर असताना मोबाईल फोनमध्ये व्यस्त असतात, ज्यामुळे अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सुरक्षेतील त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.