धक्कादायक! फुले तोडल्याच्या कारणावरून अंगणवाडी सेविकेचे कापले नाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 12:08 IST2024-01-04T12:07:04+5:302024-01-04T12:08:19+5:30

बेळगाव : अंगणवाडीतील मुलांनी फुले तोडल्याच्या कारणावरून एका अंगणवाडी सेविकेवर एकाने प्राणघातक हल्ला केल्यामुळे नाक कापले जाऊन ती गंभीर ...

Anganwadi worker's nose cut for cutting flowers in belgaon Karnatak | धक्कादायक! फुले तोडल्याच्या कारणावरून अंगणवाडी सेविकेचे कापले नाक

धक्कादायक! फुले तोडल्याच्या कारणावरून अंगणवाडी सेविकेचे कापले नाक

बेळगाव : अंगणवाडीतील मुलांनी फुले तोडल्याच्या कारणावरून एका अंगणवाडी सेविकेवर एकाने प्राणघातक हल्ला केल्यामुळे नाक कापले जाऊन ती गंभीर जखमी झाल्याची घटना बसुर्ते (जि. बेळगाव) येथे घडली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुगंधा गजानन मोरे (वय ५०), असे सेविकेचे नाव आहे.

सोमवारी दुपारी अंगणवाडीतील मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडले होते. त्यावेळी त्या मुलांनी शेजारील घराच्या अंगणातील फुले तोडली. हा प्रकार घरमालकाच्या निदर्शनास येताच त्याने त्या प्रकाराला सुगंधा मोरे यांनाच जबाबदार धरून अर्वाच्य शिवीगाळ करत त्यांच्यावर विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून, त्यांचे नाक कापले गेले आहे. या घटनेनंतर सुगंधा यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद काकती पोलिस ठाण्यात झाली आहे.

महिला मंत्र्यांच्या जिल्ह्यातच महिलांवर हल्ले

महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या जिल्ह्यात, शहर परिसरातच महिलांवर अन्याय, अत्याचाराच्या घटना वाढू लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. न्यू वंटमुरी येथे एका महिलेची विवस्त्र धिंड काढण्याचा अमानुष प्रकार घडला होता. त्याला अजून महिनाही उलटत नाही, तोवर आता बसुर्ते येथे अंगणवाडी सेविकेवर हल्ला करून तिचे नाक कापण्याचा प्रकार घडला आहे.

Web Title: Anganwadi worker's nose cut for cutting flowers in belgaon Karnatak