भीषण अपघात! छातीत आरपार घुसले 40 फुट लांबीचे गज, 5 तास चालले ऑपरेशन अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 16:43 IST2021-10-31T16:05:48+5:302021-10-31T16:43:32+5:30
अपघाताचे दृष्य पाहून कुटुंबियांचाही थरकाप उडाला.

भीषण अपघात! छातीत आरपार घुसले 40 फुट लांबीचे गज, 5 तास चालले ऑपरेशन अन्...
रोहतक: कधीही मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो, म्हणूनच डॉक्टरांना देवाचे रुप म्हटले जाते. रोहतकच्या पीजीआयएमएसमध्ये डॉक्टरांनी शनिवारी अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करुन एका तरुणाचे प्राण वाचवले. सुमारे 5 तास चाललेल्या कठीण ऑपरेशननंतर तरुणाच्या शरीरातून लोखंडाचे दोन गज बाहेर काढण्यात आले. सध्या तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर असून, रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या टीमचे आभार मानले.
नेमकं काय झालं ?
कर्ण(वय18) नावाचा तरुण आपल्या दुचाकीवरुन जात होता, तेवढ्यात समोरुन गज घेऊन जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराशी कर्णच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कर्णच्या छातीतून लांब गज आरपार गेले. अपघाताची माहिती मिळताच त्याचे कुटुंबीय अपघातस्थळी आले, अपघाताचे दृष्य पाहून त्यांचा थरकाप उडाला. कारण, अपघातात कर्णच्या छातीत तब्बल 40 फुट लांबीचे 2 गज घुसले होते. यानंतर जखमी कर्णला तातडीने खानूपर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला रोहतक पीजीआयमध्ये रेफर केले.
पाच तास चालले ऑपरेशन
पीजीआयच्या डॉक्टरांनी रात्रीच कटर मशीनने गज कापले आणि कर्णला वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. डॉक्टरांनी सुरुवातीला कर्णच्या छातीत घुसलेले गज बाहेर काढले आणि पाच तासांच्या कठीण ऑपरेशननंतर कर्णचे प्राण वाचवले. सध्या त्याला विशेष वॉर्डमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे.
अशा वेळी बहुतांश लोकांचा जागीच मृत्यू होतो
डॉ.एस.एस.लोहछाब यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ.संदीप सिंग, डॉ.फरकलीना, प्रा. नवीन महालोत्रा, डॉ.इंद्रा मलिक यांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यांच्यासाठी हे मोठे आव्हान असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी अशी प्रकरणे फार कमी वेळा पाहिली आहेत, कारण अशा प्रकरणांमध्ये बहुतेक जखमींचा जागीच मृत्यू होतो. काही लोक हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाहीत. पण, सुदैवाने कर्णचा जीव वाचला आहे.