नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:12 IST2026-01-02T15:09:07+5:302026-01-02T15:12:00+5:30
अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाशिकमध्ये भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. भाजपाचे अधिकृत उमेदवार आणि बंडखोर उमेदवार यांच्या हा वाद झाला आहे.

नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
- नरेंद्र दंडगव्हाळ, नाशिक
महापालिका निवडणूकीसाठी नाशिकमध्ये राजकीय तणाव सुरू असतानाच प्रभाग क्रमांक ३१ मधील भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. सिडकेा विभागीय कार्यालयातच मारहाण केली. देवानंद बिरारी आणि बाळकृष्ण शिरसाट यांच्यात झालेल्या या मारामारीच्या वेळी बिरारी यांच्या पत्नी वंदना या वाद सोडवण्यासाठी गेल्या असता, त्यांनाही शिरसाट यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सिडको विभागातील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये भाजपाकडून देवानंद बिरारी तसेच बाळकृष्ण शिरसाट हे दोघेही एकाच गटातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, यामध्ये देवानंद बिरारी यांना भाजपाने उमेदवारी दिली नाही.
बाळकृष्ण शिरसाट हे भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. दरम्यान, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी देवानंद बिरारी व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका वंदना बिरारी हे दोघेही मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात आले होते. अर्ज मागे घेण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी अगोदरच बाळकृष्ण शिरसाट हे उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीमुळे नाशिकमध्ये राजकीय तणाव सुरू असतानाच प्रभाग क्रमांक ३१ मधील भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. देवानंद बिरारी आणि बाळकृष्ण शिरसाट यांच्यात झालेल्या या मारामारी वेळी बिरारी यांच्या पत्नी वंदना यांना शिरसाट यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला… pic.twitter.com/fCy4Y35n0B
— Lokmat (@lokmat) January 2, 2026
देवानंद बिरारी व बाळकृष्ण शिरसाट हे समोरासमोर आल्यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ झाली. त्यानंतर वाद वाढत जाऊन दोघांमध्ये झटापट ही झाली. एकमेकांना दोघांनी मारहाण केली. तसेच वाद सोडवण्यासाठी गेलेल्या देवानंद यांच्या पत्नी वंदना बिरारी यांना देखील बाळकृष्ण शिरसाट यांनी अपशब्द वापरला, असा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान आपण वंदना बिरारी यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नसल्याचा खुलासा बाळकृष्ण शिरसाट यांनी केला आहे.