शरद पवार १३ मार्चला नाशिकमध्ये; लोकसभा निवडणुकीची तुतारी फुंकणार
By संजय पाठक | Updated: March 5, 2024 15:14 IST2024-03-05T15:14:11+5:302024-03-05T15:14:51+5:30
शरद पवार हे या मतदार संघात शेतकरी मेळावा घेणार असले तरी खऱ्या अर्थाने ते निवडणूक रणांगणावर तुतारी फुंकणार आहेत

शरद पवार १३ मार्चला नाशिकमध्ये; लोकसभा निवडणुकीची तुतारी फुंकणार
नाशिक- अत्यंत सधन आणि प्रयोगिक शेतीत अग्रेसर असलेला नाशिक जिल्ह्यातील निफाड हा तालुका राजकीय दृष्ट्या देखील सजग आहे आगामी लोकसभा निवडणूकीच्या पाश्व'भूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याच मतदार संघात निवडणूकीच्या रणाला प्रारंभ होत असल्याची तुतारी फुंकणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दृष्टीने नाशिक जिल्हा अत्यंत महत्वाचा असून निफाड तालुका हा शरद पवार यांना मानणारा आहे. कृषीच्या प्रयोगांना शरद पवार यांनी नेहमीच पाठबळ दिले आहे त्यातच सध्या तर कांदा निर्यात बंदीचा विषय गाजत आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ मानली जाते. या ठिकाणी राजकारण तापले आहे. त्यातच शेतमालाला भाव, अवकाळीचे नुकसान असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असताना शरद पवार यांची अचूकपणे निफाडचीच निवड जाहिर सभेसाठी केली आहे.
शरद पवार हे या मतदार संघात शेतकरी मेळावा घेणार असले तरी खऱ्या अर्थाने ते निवडणूक रणांगणावर तुतारी फुंकणार आहेत. या सभेसाठी निफाड किंवा लासलगाव या पैकी एका जागेची निवड करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते गोकूळ पिंगळे यांनी दिली.