Nashik Municipal Election 2026 : कोण म्हणे धनिकांना, उमेदवारी दिली कामगाराला; धक्का बसला कार्यकर्त्याला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:41 IST2026-01-06T14:40:18+5:302026-01-06T14:41:29+5:30
Nashik Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये तिकिटासाठी झालेल्या राड्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली.

Nashik Municipal Election 2026 : कोण म्हणे धनिकांना, उमेदवारी दिली कामगाराला; धक्का बसला कार्यकर्त्याला
नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये तिकिटासाठी झालेल्या राड्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली. जुन्या विशेषतः जनसंघापासून आणि नंतरही भाजपाच्या स्थापनेपासून पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या प्रकारामुळे मोठा धक्का बसला. भाजपातील जुने परंतु उमेदवारी न मिळालेले कार्यकर्तेही पक्षाने कसा अन्याय केला आणि निवडणूकांमध्ये धनिकांना उमेदवारी दिली अशा सुरस कथा सांगत आहेत. मात्र, भाजपाने अगदी सामान्य दोन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला देखील उमेदवारी दिली आहे, असा दावा भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
नाशिक भाजपाच्या इतिहासात प्रथमच उमेदवारांना दिले जाणान्या अर्जामध्ये इतके घोटाळे झाले आहेत. पक्षाच्या बाहेरून आलेल्या आयारामांना आज प्रवेश उद्या उमेदवारी अशाप्रकारे तिकीट वाटप झाले असून सामान्य कार्यकर्त्यांना मात्र, याही वर्षी थांबण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. या टीकेला उत्तर देताना भाजप नेते आता सामान्य आणि कष्टकरी भाजपा कार्यकर्त्याला कशी उमेदवारी दिली याचे दाखले सोशल मीडियावर देत आहेत.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टाकलेली अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. सातपूरमधील औद्योगिक वसाहतीत शिफ्टनिहाय काम करणाऱ्या सामान्य कुटुंबातून उमेदवारी देत आम्ही सर्वसामान्य उमेदवाराला उमेदवारी देत असल्याचे सांगितले आहे. एका खासगी कंपनीत आठ तासांची शिफ्ट ड्युटी करणारे, नोकरी सांभाळत, कुटुंबाची जबाबदारी पेलत आणि त्याच वेळी अनेक वर्षे भाजपचं संघटनात्मक काम प्रामाणिकपणे करणाऱ्याला मंडल स्तरावर विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
राजकारण म्हणजे केवळ भाषणं नव्हे, तर घराघरांतून उभं राहिलेलं नेतृत्व असतं, हे ते कुटुंब दाखवून देत आहे. ही उमेदवारी कुठल्या घराण्याची नाही, कुठल्या श्रीमंतीची नाही-तर काम करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबाची आहे. असे पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यावर बऱ्या वाईट प्रतिक्रियादेखील उमटल्या आहेत.
नेटिझन्सकडून करमणूक
एका कार्यकर्त्यांला दिलेल्या तिकिटाचा हा देखावा आहे, असे काहींनी म्हटले आहे तर काहींनी भाजपच्या निष्ठेचे फळ असल्याचे म्हणाले. नेटिझन्सच्या प्रतिक्रियांनी मात्र करमणूक होत आहे.