Nashik Municipal Election 2026 : बडगुजर-शहाणे यांच्या लढतीमुळे प्रभाग २९ 'हॉटस्पॉट'; काट्याच्या लढतीमुळे रंगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:05 IST2026-01-13T16:03:12+5:302026-01-13T16:05:09+5:30
Nashik Municipal Election 2026 : माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा भाजपाकडून मिळालेला एबी फॉर्म बाद झाल्यानंतर त्यांची व सुधाकर बडगुजर यांच्यातील कटुता पुन्हा वाढली आहे

Nashik Municipal Election 2026 : बडगुजर-शहाणे यांच्या लढतीमुळे प्रभाग २९ 'हॉटस्पॉट'; काट्याच्या लढतीमुळे रंगत
सिडको : सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ अ मनपा निवडणुकीसाठी हॉटस्पॉट बनला आहे. माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा भाजपाकडून मिळालेला एबी फॉर्म बाद झाल्यानंतर त्यांची व सुधाकर बडगुजर यांच्यातील कटुता पुन्हा वाढली आहे. अपक्ष असलेले शहाणे यांची लढत सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांच्याशी होत असल्याने राजकीय दृष्ट्या हा प्रभाग संवेदनशील बनला आहे. शहाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने त्यांना पक्षाने सहा वर्षांसाठी नुकतेच निलंबित केले, मात्र तरीही सर्वशक्तिनिशी निवडणुक लढवित आहेत.
विशेष म्हणजे पक्षाने आधी दिपक बडगुजर यांना उमेदवारी देऊन नंतर मुकेश शहाणे यांना दिली एबी फॉर्म उशीरा मिळाल्याने शहाणे यांना अपक्ष निवडणुक लढवावी लागत आहे. यामुळे प्रभागात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे या प्रभागातील निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रभागात २०१७ ला झालेल्या निवडणुकीत मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, रत्नमाला राणे, छाया देवांग असे चार नगरसेवक निवडून आले होते. पूर्वीपासूनच हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अ गटातून भाजपकडून दीपक बडगुजर, शिंदे सेनेकडून जनार्दन नागरे, आम आदमी पार्टीचे नूतन कोरडे तर अपक्ष म्हणून माजी नगरसेवक मुकेश शहाणे हे निवडणूक रिंगणात आहेत. या गटात दीपक बडगुजर व मुकेश शहाणे यांच्यात काट्याची लढत होत असली तरी शिंदे सेनेचे जनार्दन नागरे हेदेखील चांगली लढत देत असल्याचे चित्र आहे.
प्रभागात ब गटातून भाजपच्या योगिता हिरे, शिंदे सेनेच्या श्रद्धा सुयश पाटील, मनसेच्या वर्षा अर्जुन वेताळ तर अपक्ष म्हणून पूनम धात्रक व यमुना घुगे है निवडणूक रिंगणात आहेत. या ठिकाणीही योगिता हिरे व श्रद्धा पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे तर वर्षा वेताळ ह्यादेखील आपले नशीब आजमावत आहेत. प्रभागातील दोन लढती सर्वाधिक चुरशीच्या असल्याने सिडकोवासियांचे लक्ष लागून आहे.
'क' गटातही तुल्यबळ लढत
प्रभागातील क गटातून भाजपकडून माजी नगरसेविका छाया दिलीप देवांग, शिंदेसेनेकडून माजी नगरसेविका सुमन वामनराव सोनवणे, उद्धवसेनेच्या मोनिका अंकुश वराडे, तर अपक्ष म्हणून शोभा चौधरी या निवडणूक रिंगणात आहेत.
याच गटातून माजी नगरसेविका शीला भागवत यांनी माघार घेतली. या गटात छाया देवांग यांचा सामना सुमन सोनवणे व मोनिका वराडे यांच्यात होत असल्याने या ठिकाणी तिरंगी लढत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
माजी नगरसेविका रत्नमाला राणे यांचे पुत्र भूषण राणे, उद्धवसेनेचे देवाभाऊ वाघमारे, शिदेसेना या पक्षाकडून जितेंद्र जाधव उर्फ जितू बाबा, माकपकडून संतोष काकडे व आम आदमी पार्टीचे सुरज पुरोहित तसेच वंचित बहुजन आघाडीकडून देवचंद केदारे, तर अपक्ष म्हणून कुणाल धात्रक व गौतम पराडे हे आपले नशीब आजमावत आहेत.