Nashik Municipal Election 2026 : अस्तित्वाच्या लढाईसाठी दोन माजी महापौर शिंदेसेनेच्या गडावर, नाराज भोसले यांचे पक्षांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:01 IST2026-01-07T12:59:46+5:302026-01-07T13:01:33+5:30
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत स्वतःला आणि काहींनी आपल्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपात प्रवेश केला.

Nashik Municipal Election 2026 : अस्तित्वाच्या लढाईसाठी दोन माजी महापौर शिंदेसेनेच्या गडावर, नाराज भोसले यांचे पक्षांतर
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत स्वतःला आणि काहींनी आपल्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपात प्रवेश केला. मात्र, तेथे उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या दोन माजी महापौर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हा पक्ष सोडून शिंदेसेनेत प्रवेश केल आहे. शिवसेनेचे माजी महापौर दशरथ पाटील, मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक आणि मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी हा प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या प्रवेश सोहळ्यास पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. नाशिक महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही महिन्यांपूर्वी अशोक मुर्तडक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपत प्रवेश केला होता. ते प्रभाग ६ मधून इच्छुक होते. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी प्रभाग क्रमांक ६मधून उमेदवारी केली आहे. त्यांना शिंदेसेनेने पुरस्कृत केले आहे. मध्यंतरी भाजपत आयारामांना प्रवेश देण्यास विरोध करण्यासाठी जो ड्रामा झाला, त्यावेळी मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्यासह प्रवेश केला होता. प्रभाग क्र. १३ मधून भोसले यांच्या कुटुंबातील महिला सदस्य इच्छुक होत्या. मात्र, त्यांना टाळून अन्य उमेद्वाराला भाजपने उमेदवारी दिली, तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक ९ मध्येही अशीच अवस्था आहे.
भाजप सोडून मनसेत गेलेल्या दिनकर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप, आणि गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे त्यांना आता भाजप प्रवेश देणार नाही, असे वाटल्याने माजी महापौर दशरथ पाटील आणि त्यांचे पुत्र प्रेम पाटील यांनी भाजपत प्रवेश केला होता. मात्र, भाजपच्या विरोधात कठोर टीका करूनही दिनकर पाटील यांना भाजपने प्रवेश दिला. त्यामुळे याच प्रभागातील त्यांचे विरोधक असलेल्या प्रेम पाटील यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला, त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दशरथ पाटील यांनीही प्रवेशाची औपचारिकता पार पाडत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे सातपूर विभागातील प्रभाग क्र. ९ मधील निवडणूक रंगणार आहे.
दोन कुंभमेळा काळातील महापौर शिंदेसेनेत
सन २००२-०३मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी शिवसेनेकडून दशरथ पाटील महापौर होते. त्यानंतर २०१४-१५मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी मनसेचे अशोक मुर्तडक हे महापौर होते. आता २०२६-२७मध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याच्या वेळी हे दोघे माजी शिंदेसेनेत दाखल झाले आहेत.
दशरथ पाटील यांचे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण
माजी महापौर दशरथ पाटील यांनी शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. महापौरपद भूषवले, त्यानंतर त्यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मध्यंतरी अनेक पक्षांच्या जवळ ते गेले, विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षात जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने ते थांबले होते. प्रेम पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपत सक्रिय होण्याचे संकेत दिले होते. परंतु, प्रेम पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने ते पुत्र प्रेम पाठोपाठ पुन्हा शिवसेनेत दाखल झाल्याने शिवसेना ते शिवसेना असे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.
नाराज भोसले यांचे अनेकदा पक्षांतर
माजी आमदार नितीन भोसले यांचे कुटुंबीय काँग्रेसचे घराणे म्हणून परिचित होते. त्यामुळे नितीन भोसले यांनी काँग्रेसपक्षात राजकीय कार्याला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी काहीकाळ शिवसेनेत काम केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर त्यांनी या पक्षात प्रवेश केला, २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते पश्चिम नाशिक मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांना विधानसभेत संधी मिळाली नसली तरी त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) मध्ये प्रवेश करून नद्याजोड प्रकल्पांवर काम सुरू केले होते. आता त्यांनी हा पक्ष सोडून सोमवारी (दि. ५) रात्री शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.