"तपोवनाची जागा कायम खुलीच राहील"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:46 IST2026-01-12T15:45:06+5:302026-01-12T15:46:50+5:30
Nashik Municipal Election 2026 And Devendra Fadnavis : सिंहस्थापूर्वी गोदावरी नदीचे पाणी इतके शुध्द करू की त्यात अंघोळ करता येईलच, परंतु ते पिताही येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

"तपोवनाची जागा कायम खुलीच राहील"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
नाशिक -भाजप हा रामाला मानणारा पक्ष आहे. त्यामुळे तपोवनाबाबत काळजी घेऊन ही जागा कायम खुली ठेवण्यात येईल. त्या ठिकाणी कोणताही व्यावसायिक प्रकल्प उभारणार नाही. सिंहस्थापूर्वी गोदावरी नदीचे पाणी इतके शुध्द करू की त्यात अंघोळ करता येईलच, परंतु ते पिताही येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ११) गोदाकाठी झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, माजी आ. बाळासाहेब सानप, सुनील केदार उपस्थित होते.
तपोवनात साधुग्रामसाठी वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना फडणवीस यांनी गुगल इमेजेस दाखवीत याबाबत होत असलेल्या आरोपांचा समाचार घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना २०१६ मध्ये महापालिकेत मनसेची सत्ता असताना तपोवनातील जागेचा वापर ११ वर्षे प्रदर्शनांसाठी करण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत केल्याचे कागदपत्रही फडणवीस यांनी दाखवले.
कोविडकाळात सत्ताधारी घरात बसून होते
काल परवा दोन भाऊ नाशिकला येऊन गेले, परंतु त्यांना रामाची आठवण झाली नाही... अशी उद्धव आणि राज यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, जो समाचा नाही, तो कामाचा नाही. डाव्या लोकांनी येथे आंदोलन करताना कुंभाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. अकबराने कुंभ सुरू केला असे ते सांगतात. मात्र, अकबराच्या कित्येक पिढ्यांआधी कुंभाचे स्नान सुरू झाले होते असे सांगत, कोणी टीका केली तरी कुंभ बंद पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोविड काळात आपण राज्यभर दौरा करत होतो. मात्र, हे सत्ता असताना घरात बसून होते अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.