Nashik Municipal Election 2026 : नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! उमेदवाराने माघार घेऊ नये यासाठी समर्थकांनीच कोंडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:27 IST2026-01-03T12:26:10+5:302026-01-03T12:27:43+5:30
Nashik Municipal Election 2026 : पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपचे बंडखोर ज्ञानेश्वर काकड तसेच त्यांची पत्नी सुनीता यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Nashik Municipal Election 2026 : नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! उमेदवाराने माघार घेऊ नये यासाठी समर्थकांनीच कोंडले
नाशिक : महापालिका निवडणूक म्हटली की अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब केला जातो. त्यामुळेच अनेक उमेदवार दबावाला बळीही पडतात. हा प्रकार टाळण्यासाठी नाशिकमधील एका अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनी अजब शक्कल लढवली. त्यांनी आपल्या उमेदवारालाच चक्क एका खोलीत कोंडून ठेवले. त्या खोलीबाहेर त्यांचा जयघोष केला, पण माघारीची मुदत संपल्यानंतरच त्याला बाहेर काढले.
अर्थात, यानंतर त्यांनी स्वतः अन्य अपक्षांशी तडजोड करून माघार घेतली खरी, परंतु पत्नीचा अर्ज मात्र कायम ठेवला आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत शुक्रवारी (दि. २) माघारीसाठी शेवटचा दिवस होता. पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपचे बंडखोर ज्ञानेश्वर काकड तसेच त्यांची पत्नी सुनीता यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अपक्ष ज्ञानेश्वर काकड भाजपचे माजी मंडल अध्यक्षही होते. पक्षाने अन्याय केल्याचा दावा करत त्यांनी अर्ज दाखल केला होता.
भाजपचे माजी पंचवटी मंडल अध्यक्ष असून, त्यामुळेच त्यांनी माघार घ्यावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यांनी आपला फोन स्वीच ऑफ ठेवल्याने मखमलाबाद शिवारातील त्यांच्या नातेवाईकांना माघार घेण्यास सांगा, असे निरोप सुरू झाले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी अजब प्रकार केला. त्यांना घरातच कोंडून बाहेर स्वतःच जागता पहारा ठेवला. अर्थात, अपक्षांना एकत्र करून काकड यांनी पॅनल तयार केले होते. त्याला अडचण होऊ नये यासाठी स्वतःचा अर्ज माघारी घेतला, पण पत्नी सुनीता यांचा अर्ज मात्र कायम ठेवला. काकड यांनी अर्ज माघारी घेऊ नये, यासाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या घरात कोंडून ठेवल्याचा खुलासा स्वता काकड यांनी केला असून, त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.