Nashik Municipal Election 2026 : २०१२ मध्ये ब्ल्यू प्रिंट; २०१७ मध्ये दत्तक, यंदा काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 12:11 IST2026-01-11T12:10:29+5:302026-01-11T12:11:15+5:30
Nashik Municipal Election 2026 And Devendra Fadnavis : नाशिककरांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणी वाली नाही तसेच विकासासाठी अपेक्षित राजकीय नेतृत्व नाही ही नाशिककरांची नेहमीची ओरड असते त्यावर फुंकर घातल्यानंतर नाशिककर संबंधित नेत्याला साथ देतात असा अनुभव आहे.

Nashik Municipal Election 2026 : २०१२ मध्ये ब्ल्यू प्रिंट; २०१७ मध्ये दत्तक, यंदा काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांकडे लक्ष
नाशिक - उपेक्षित नाशिककरांना विकासाची आस लागली असल्याने २०१२ मध्ये राज ठाकरे यांनी ब्लू प्रिंटची घोषणा केली, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आली. त्यानंतर २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली आणि महापालिकेत भाजपला बहुमत मिळाले. आता २०२६ मध्ये होत असलेल्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची पुन्हा सभा होत असून, अशावेळी कोणत्या घोषणेने ते नाशिककरांना आकर्षित करणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे.
महापालिकेची ही सातवी पंचवार्षिक निवडणूक आहे. नाशिककरांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणी वाली नाही तसेच विकासासाठी अपेक्षित राजकीय नेतृत्व नाही ही नाशिककरांची नेहमीची ओरड असते त्यावर फुंकर घातल्यानंतर नाशिककर संबंधित नेत्याला साथ देतात असा अनुभव आहे.
२०१२ मध्ये नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हवा होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिककरांना विकासाची ब्लू प्रिंट दाखवली. तसेच त्यावेळी नाशिकमध्ये असलेले कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाला हात घातला. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच कोणत्याही एका पक्षाला सिंगल लार्जेस्ट म्हणजे सर्वाधिक ४० संख्याबळ मिळाले. अर्थात बहुमत नव्हते परंतु तरीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाच वर्षे सत्ता राबवली.
२०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी नाशिककरांची नस ओळखून नाशिकला दत्तक घेतो असे अश्वासन दिले आणि नाशिककरांनी भरभरून मतांचं दान त्यांच्या पदरात घातलं. महापालिकेच्या इतिहास ६६ जागा मिळवून पूर्ण बहुमत मिळवणारा पक्ष म्हणून भाजपचे नाव कोरले गेले. आता पुन्हा नाशिककरांच्या भावनेला मुख्यमंत्री काय साद घालणार याबाबत उत्सुकता आहे.
शुक्रवारी (दि. ९) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त सभा झाली. त्यानंतर शनिवारी (दि. १०) शिंदेसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. त्यांनी स्थानिक मुद्द्यांना बऱ्यापैकी हात घातला असून, त्यांनी नाशिकच्या संदर्भात अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच आपल्या मातेप्रमाणे सेवा करू, असे सांगितले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय घोषणा करतात याकडे लक्ष लागून आहे.