भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:13 IST2026-01-01T13:13:18+5:302026-01-01T13:13:57+5:30
Nashik Municipal Election 2026: ठाकरे गटाचे आव्हान परतवण्यासाठी भाजपाने मोठी खेळी केली होती.

भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
Nashik Municipal Election 2026: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु, युती-आघाडीच्या निर्णयात झालेला उशीर, जागावाटपांचे अडलेले घोडे आणि हातातून निसटून चाललेली वेळ यामुळे संपूर्ण राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांमध्ये अभूतपूर्व गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. यातच नाशिक येथे भाजपाने खेळलेल्या एका खेळीमुळे ठाकरे गटाचे बहुसंख्य उमेदवार बाद ठरण्याच्या मार्गावर होते. परंतु, निवडणूक अधिकाऱ्यांमुळे भाजपाचा डाव यशस्वी झाला नसल्याचे म्हटले जात आहे.
राज्याच्या राजकारणात भाजप विरुद्ध ठाकरे सेना संघर्ष कायम राहिला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट व शिंदेसेनेला एकमेकांविरोधात उभे करीत भाजपाने मैदान मारले. नाशिक महापालिका निवडणुकीत मात्र भाजपाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजप सोडून एकत्र येत युती केली. ठाकरे गटाचे आव्हान परतवण्यासाठी भाजपाने मोठी खेळी केली.
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद
नाशिक महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाने महाविकास आघाडीत सामील होत १२२ पैकी ८२ जागांवर उमेदवार उभे केले. उद्धवसेनेचे आव्हान परतवून लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला गेला. ठाकरेंच्या उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांवर भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी हरकत घेतली होती. उमेदवारी अर्जासोबतच्या पक्षाच्या एबी फॉर्मपैकी बी फॉर्मवर मूळ स्वाक्षरी नसल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्याची मागणी भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली. परंतु, ती फेटाळण्यात आली. निवडणूक आयोगाने अर्ज वैध ठरवले.
दरम्यान, नाशिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एबी फॉर्म वाटपावरून झालेल्या 'राड्या'चे साइड इफेक्टस भाजपला जाणवू लागले आहेत. अतिरिक्त एबी फॉर्म वाटल्या गेलेल्या ठिकाणांपैकी सिडकोत एकूण चार भाजप उमेदवारांबाबत घोळ झाला आहे. परिणामी प्रभाग २५ मध्ये उद्धवसेनेतून भाजपत आलेल्या सुधाकर बडगुजर यांच्यासह त्यांची पत्नी हर्षा व मुलगा दीपक यांचे एबी फॉर्म अगोदर मिळाल्याने ते पक्षाचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत, तर याच प्रभागात भाजपने एबी फॉर्म दिलेल्या भाग्यश्री ढोमसे व पुष्पलता पवार यांना अधिकृत उमेदवारीपासून वंचित राहावे लागले आहे. असाच प्रकार प्रभाग २९ मध्ये मुकेश शहाणे आणि प्रभाग २४ मध्ये सुरेखा नेरकर यांच्याबाबतही झाला आहे. परिणामी, या ठिकाणची समीकरणे येत्या काळात बदलणार आहेत.