"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 17:39 IST2026-01-11T17:37:06+5:302026-01-11T17:39:41+5:30
Girish Mahajan vs Raj Thackeray Uddhav Thackeray: नाशिकच्या प्रचारसभेत उद्धव आणि राज ठाकरे यांच्या कडाडून टीका

"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
Girish Mahajan vs Raj Thackeray Uddhav Thackeray: पावसाळा आल्यानंतर जसे बेडूक बाहेर येतात, तसे ठाकरे बंधू निवडणूक असल्यामुळे बाहेर पडले आहेत. निवडणूक आली की नाटकं करतात. लोक येतात, शिट्ट्या मारतात, पण मतांमध्ये त्याचे परिवर्तन होत नाही. पंचवीस वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे होती, तेव्हा तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाल्लेत. लोक आता यांना स्वीकाराला तयार नाही. लोकांचा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. आता मतदार महायुतीवर विश्वास ठेवतात. मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी एक तरी महानगरपालिका जिंकून दाखवावी, अशा शब्दांत रविवारी नाशिक येथील प्रचारसभेत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंवर टीकेची तोफ डागली.
"नाशिकसह सर्व महापालिकांची निवडणूक आता २ दिवसांवर आली आहे. नाशकात आपल्याला १२२ पैकी १००हून जास्त नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. या वेळेसही कुंभमेळा आहे. आपल्याला भरपूर काम करायचे आहे. प्रयागराजपेक्षा मोठा कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. अर्धी कामे सुरू आहेत, अर्धी कामे आचारसंहिता संपली का सुरू होतील. आपण सर्व रस्ते सिमेंटचे करणार आहोत. म्हणजे पुढली २० वर्ष एकही खड्डा पडणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लाकुडतोड्या टीकेला प्रत्युत्तर
"तपोवनातील झाडांचा मुद्दाम विषय वाढवला जात आहे. आंदोलनामध्ये डाव्या विचारसरणीची लोकं शिरली आहेत. हे लोक मुद्दाम आमच्या झाडांना चिटकून बसलेले आहेत. परवा झालेल्या सभेत ठाकरे ब्रँड इकडे आला आण मला लाकूडतोड्या म्हणाला. आदित्य ठाकरे यांना इतक्या दिवसांनी नाशिक आठवले. त्यामुळे ते सुद्धा येऊन झाडांना मिठी मारून गेले. पण मी सांगतो की, मी २० हजार झाडे लावतो आहे", असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
"सहा महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये गुंडगिरी होती. देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं आणि गुंडगिरीचा बीमोड केला. विकास करण्यासाठी सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत असायला पाहिजे. विकासाचे अनेक मुद्दे आपल्याला सांगता येतील. पण विरोधक बोलघेवडे आहेत. त्यांच्या हातामध्ये काहीच नाही. सर्वांना कमळाचे बटण दाबून भाजपला मतदान करण्याचे आवाहन करा. आपल्याला नाशिकमध्ये शंभरी पार करायची आहे," असे आवाहन त्यांनी केले.