Dada Bhuse : "भाजपनेच युतीच्या चर्चेचे दार बंद केले, नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:38 IST2026-01-05T13:37:53+5:302026-01-05T13:38:33+5:30
Nashik Municipal Election 2026 And Dada Bhuse : नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल, असा टोला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भाजपला नाव न घेता पत्रकारांशी बोलताना लगावला.

Dada Bhuse : "भाजपनेच युतीच्या चर्चेचे दार बंद केले, नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल"
मनपा निवडणुकीत भाजपसोबत युतीसाठी चर्चेचे दार आम्ही खुले ठेवले होते. भाजप नेत्यांशी चर्चादेखील चालली होती. जागा वाटपाचे नियोजनही होत होते; परंतु त्यांनीच नंतर युतीचे द्वार बंद केले. सत्तेत येण्याच्या कोणाला कितीही वल्गना करू द्या. नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल, असा टोला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भाजपला नाव न घेता पत्रकारांशी बोलताना लगावला.
माजी खासदार हेमंत गोडसे यांनी त्र्यंबकेश्वरच्या निकालाची पुनरावृत्ती नाशिकमध्ये होणार असल्याचे सांगून भाजपलाच आव्हान दिले. १२ जानेवारीला एकनाथ शिंदे यांची शहरात प्रचार सभा होणार असल्याचे भुसे म्हणाले. उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याही सभा होणार असल्याचे भुसे म्हणाले.
नाशिकच्या विकासाचे व्हिजन घेऊन आम्ही जनतेत जात आहोत. उमेदवारी देताना वशिलेबाजी झाली, आर्थिक व्यवहाराचाही आरोप होत आहे? या प्रश्नावर दादा भुसे म्हणाले की, उमेदवारीसाठी कार्यकर्ते जास्त इच्छुक असतात. त्यातून मार्ग काढावा लागतो. निवडणूक आली की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, असा खोटा प्रचार उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातो. युतीचे अनेक नगरसेवक बिनविरोध आल्यानंतर विरोधकांकडून चुकीचा प्रचार केला जात असल्याचे भुसे म्हणाले.