आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 06:10 IST2026-01-10T06:09:31+5:302026-01-10T06:10:33+5:30
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा; दोघे जवळपास २२ वर्षांनंतर नाशिकमध्ये एकत्र

आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : आम्ही आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, तर राज्यातील भावी पिढीच्या सुरक्षित भवितव्यासाठी एकत्र आल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये झालेल्या पहिल्या संयुक्त सभेत केला. महापालिका निवडणुकीच्या प्रचारातील दोघांची पहिली संयुक्त सभा येथील अनंत कान्हेरे मैदानावर शुक्रवारी सायंकाळी झाली. दोघे जवळपास २२ वर्षांनंतर नाशिकमध्ये एकत्र आले होते.
राज्यातील जनतेचे प्रश्न वाऱ्यावर सोडून भाजप आणि शिंदेसेना केवळ फोडाफोडी आणि भ्रष्टाचारात मश्गुल असून, दलालांच्या माध्यमातून मुंबईसह राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांतील भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा उद्योग सत्ताधारी करत असल्याची टीका उद्धव व राज ठाकरे यांनी येथील संयुक्त प्रचारसभेत केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, यांना आमची पोरे पळवावी लागत आहेत. फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती, मात्र वास्तवात आता त्यांना आमच्या पक्षातील नेते-कार्यकर्ते दत्तक घ्यावे लागत आहेत. सध्या भाजपमध्ये बाहेरच्यांची एवढी गर्दी झाली आहे की, निष्ठावंतांना कुठेच जागा नाही.
एका घरातील ३ उमेदवारांना १५ कोटी रुपयांची ऑफर
महाराष्ट्रात ६०-७० नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यासाठी किती पैसा खर्च केला? कल्याणमध्ये एका घरातील तीन उमेदवारांना १५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. इतके पैसे कुठून येतात? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. नाशिकच्या तपोवनातील वृक्षांची छाटणी करण्यापूर्वीच भाजपने आपल्या निष्ठावंतांची छाटणी केल्याची टीकाही राज यांनी यावेळी केली.
निवडणुका पुढे का गेल्या, उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार वर्षे पुढे का गेल्या, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यायला हवे असे सांगत १९५२ साली जन्माला आलेल्या पक्षाला २०२६ मध्येही दुसऱ्याची पोरे दत्तक घ्यायला लागतात, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपची खिल्ली उडवली.