“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:02 IST2026-01-02T13:02:11+5:302026-01-02T13:02:11+5:30
Nashik Municipal Election 2026: गेली वीस वर्षे भाजपासाठी प्रामाणिकपणे काम केले. तरीही मला उमेदवारी नाकारण्यात आली, अशी खंत या नेत्यांनी बोलून दाखवली.

“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
Nashik Municipal Election 2026: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु, युती-आघाडीच्या निर्णयात झालेला उशीर, जागावाटपांचे अडलेले घोडे आणि हातातून निसटून चाललेली वेळ यामुळे संपूर्ण राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांमध्ये अभूतपूर्व गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. यातच निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने प्रचंड नाराजी पसरली आहे. बंडखोरीचे प्रमाणही वाढलेले पाहायला मिळत आहे. यातच आता पंतप्रधान मोदी यांना फोन आला, तरी माघार घेणार नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढणार, असा एल्गार तिकीट नाकारलेल्या भाजपा नेत्यांनी केला आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोडपासून पंचवटीपर्यंत सुरू झालेल्या बंडखोरीमुळे भाजपाची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्यास निवडणूक समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. या बंडखोरीवर पक्ष नेतृत्व आता कसा तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपमधील अंतर्गत असंतोष उघडपणे समोर येत आहे. नाशिक रोड येथील भाजपा कार्यालयात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा राडा सुरू असतानाच, पंचवटीतील प्रभाग क्रमांक एकमधून आणखी एक मोठी बंडखोरी समोर आली आहे. भाजप शहर सरचिटणीस आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अमित घुगे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली असून, अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर ठाम असल्याचेही अमित घुगे यांचे म्हणणे आहे.
आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही
मी शहराध्यक्ष आणि संबंधित आमदारांना तब्बल पंधरा वेळा फोन केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. या प्रक्रियेशी मंत्री गिरीश महाजन यांचा थेट संबंध नाही, पण शहराध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी माझा विश्वासघात केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोन आला तरी मी उमेदवारी मागे घेणार नाही. भाजप मला आईसमान आहे. माझी स्वतःची आर्थिक क्षमता आहे. शिवाय अनेक कार्यकर्ते माझ्यासाठी खर्च उचलण्यास तयार आहेत, असेही घुगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मागील निवडणुकीत तसेच यावेळीही आपण सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच गेली वीस वर्षे भाजपासाठी प्रामाणिकपणे काम केले. युवक मोर्चापासून ते शहर सरचिटणीसपदापर्यंत प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडली. तरीही मला उमेदवारी नाकारण्यात आली, अशी खंत घुगे यांनी बोलून दाखवली.