भाजपात नाराजीचा स्फोट! उमेदवारी जाहीर होताच १० मिनिटांत नाशिक भाजपा शहराध्यक्षाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:48 IST2026-02-04T12:46:58+5:302026-02-04T12:48:03+5:30
दोन्ही नावांऐवजी महापौरपदासाठी हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव घोषित करण्यात आले आणि शहराध्यक्ष सुनील केदार नाराज झाले.

भाजपात नाराजीचा स्फोट! उमेदवारी जाहीर होताच १० मिनिटांत नाशिक भाजपा शहराध्यक्षाचा राजीनामा
नाशिक - महापालिका निवडणुकीत अनेक प्रकारचे घोळ झाल्यानंतरही पक्षशिस्त म्हणून कायम राहिलेल्या शहराध्यक्ष सुनील केदार यांनी महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार घोषित होताच तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पुढील व्यवस्था होईपर्यंत आपण काम बघू असे त्यांनी पक्षनेत्यांना कळवले आहे.प्रदेश पक्षनेत्यांकडून जी नावे निश्चित झाली, ती डावलून दुसरीच नावे घोषित केल्याचा केदार यांचा दावा असल्याचे समजते. त्यामुळे भाजपात खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी अनेक दावेदार होते. त्यात नवे आणि जुने अशा दोन्ही प्रकारचे दावेदार होते. काहींनी यापूर्वी खूप पदे भोगलेली होती तर काहींना नव्याने प्रवेश केल्यानंतर पहिल्याच वेळी पद हवे होते. महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपाच्या वादातूनदेखील अनेकदा गोंधळ झाला होता. त्यावेळी केदार यांनी यापुढे पार्टीलाईनवर चालणारेच पदाधिकारी महापालिकेत नेमले जातील अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर स्थानिक कोअर कमिटी आणि इच्छुकांशी झालेल्या चर्चेनंतर चार नावे प्रदेश कोअर कमिटीकडे पाठवण्यात आली होती. यातून दोन नावे मंगळवारी दुपारी प्रदेश कार्यालयातून कळवण्यात येणार होती.
त्यानुसार मंगळवारी सकाळी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील तारांकित हॉटेलमध्ये नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील होते. त्यांनी पावणेदोन वाजेच्या सुमारास मुंबईत प्रदेश नेत्यांना फोन केला आणि त्यानंतर अंतिम नावे आल्याचे सांगितले. प्रदेश कार्यालयाकडे दोन नावे पाठवण्यात आली होती. त्यापैकी दोन्ही नावांऐवजी महापौरपदासाठी हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव घोषित करण्यात आले आणि शहराध्यक्ष सुनील केदार नाराज झाले.
ही दोन नावे कोणती?
स्थानिक भाजपाकडून चार नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आली होती. त्यातील दोन नावे घोषित करण्यात आली खरी. मात्र, अन्य दोन नावे कोणती, हे पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी गुलदस्त्यातच ठेवली. आता केदार यांच्या राजीनाम्यामुळे ही दोन नावे कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना मॅसेज
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी पावणेदोन वाजेच्या सुमारास उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर केदार नाराज झाले. गेली ४१ वर्षे पक्ष संघटनेत आपण काम करीत आहोत. मात्र पक्षश्रेष्ठींकडून निश्चित झाल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचा दावा केदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात केल्याचे समजते.