नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:19 IST2025-12-25T12:16:05+5:302025-12-25T12:19:47+5:30
२ माजी महापौरांचा भाजपात प्रवेश होणार, प्रभागातील इच्छुकांनी केला विरोध, आमदार देवयानी फरांदेही नाराज

नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. नाशिकमध्ये उद्धवसेनेला धक्का देण्याची रणनीती भाजपाने आखली, ठाकरेंकडील २ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश भाजपात होणार होता परंतु त्यावरून भाजपात नाराजी पसरली आहे. विनायक पांडे, यतीन वाघ हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांच्याविरोधात विरोध करण्यात आला आहे. त्याशिवाय काँग्रेसच्या शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशालाही विरोध होत आहे. त्यामुळे पक्षप्रवेशावरून भाजपात मोठं नाराजीनाट्य रंगले आहे. त्याचे पडसाद भाजपा कार्यालयात फरांदे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
उद्धवसेनेचे सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध झाल्याने तो पक्षप्रवेश लांबणीवर पडला होता. देवयानी फरांदे यांनी बडगुजर यांना पक्षात घेण्यास विरोध केला तरीही तो पक्षप्रवेश झाला होता. त्यानंतर आता पुन्हा विनायक पांडे, यतीन वाघ यांचा भाजपात पक्षप्रवेश होत असल्याने फरांदे यांची नाराजी वाढली आहे. याबाबत जाहीरपणे देवयानी फरांदे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा पक्षप्रवेशाबाबत करण्यात आलेली नाही असं विधान त्यांनी केले आहे.
नाशिकच्या प्रभाग क्रमांक १३ येथील पक्षप्रवेशावरून भाजपातील अंतर्गत वाद चिघळला आहे. निष्ठावंतांना डावलून पक्षप्रवेश केलेल्यांना संधी मिळणार का असा प्रश्न भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे. या नेत्यांना उमेदवारीचं आश्वासन देऊन पक्षात घेतले जात आहे असा आरोप कार्यकर्त्यांचा आहे त्यामुळे भाजपातील पक्षप्रवेश ही नेत्यांसमोर डोकेदुखी ठरत असल्याचं दिसून येते. विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करत भाजपा कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये देवयानी फरांदे यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली. या पक्षप्रवेशाला विरोध करणारी फरांदे यांची सोशल मिडिया पोस्ट व्हायरल झाली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर २ माजी महापौर भाजपात पक्षप्रवेश करत आहेत. परंतु या पक्षप्रवेशावरून भाजपातील नाराजीनाट्य समोर आले आहे. देवयानी फरांदे आणि त्यांच्या समर्थकांनी या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध केला आहे. बाहेरून येणाऱ्यांना तिकीट मिळते आणि इतकी वर्ष पक्षाचे काम करून आम्हाला न्याय मिळत नाही अशी भावना संतप्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर संघटना कशाला हवी, बाहेरचे लोक निवडून येणार असतील तर आम्ही काय करायचे हा प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारला. मात्र या प्रकरणावरून नाराज देवयानी फरांदे यांना मंत्री गिरीश महाजन चर्चेसाठी बोलावले आहे.