"मला उपमहापौर झालेला बघताना आज आई हवी होती", विलास शिंदेंना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:51 IST2026-02-07T14:49:42+5:302026-02-07T14:51:34+5:30
नाशिक शहराच्या राजकारणात आनंदाचा क्षण साजरा होत असतानाच एक हृदयस्पर्शी दृश्य सभागृहाबाहेर पाहायला मिळाले.

"मला उपमहापौर झालेला बघताना आज आई हवी होती", विलास शिंदेंना अश्रू अनावर
नाशिक शहराच्या राजकारणात आनंदाचा क्षण साजरा होत असतानाच एक हृदयस्पर्शी दृश्य सभागृहाबाहेर पाहायला मिळाले. विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड जाहीर होताच त्यांना भावना अनावर झाल्या. 'मला उपमहापौर झालेला बघताना आज आई हवी होती...' असे म्हणत त्यांनी अश्रूना वाट मोकळी करून दिली.
विलास शिंदे यांच्या मातोश्री अनुसया रामदास शिंदे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले होते.आईच्या जाण्याचे दुःख अजूनही त्यांच्या मनात खोलवर रुतलेले असतानाच त्यांच्या आयुष्यातील हा मोठा राजकीय टप्पा गाठला गेला.
उपमहापौरपदाची घोषणा होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला, पण, सभागृहाबाहेर आल्यानंतर विलास शिंदे मात्र भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हा प्रसंग पाहून उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. या कठीण क्षणी शिंदेसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी त्यांना धीर दिला. त्यांनी विलास शिंदे यांना सावरत 'तुमची आई आज तुमच्यावर अभिमानाने पाहत असेल,' असे शब्द सांगितले.