बागलाणमध्ये बोरसे यांनी मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 00:30 IST2019-10-24T23:56:10+5:302019-10-25T00:30:40+5:30
बागलाण मतदारसंघात भाजपच्या दिलीप मंगळू बोरसे यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा 33,694 मतांनी दणदणीत पराभव केला. बोरसे यांनी तालुक्यात ल. तो. पवार यांच्यानंतर प्रथमच दोनवेळा आमदारकी मिळविण्याचा विक्रम केला असून बागलाणच्या राजकारणाने आता पूर्णपणे कूस बदलली आहे.

बागलाणमध्ये बोरसे यांनी मारली बाजी
सटाणा : बागलाण मतदारसंघात भाजपच्या दिलीप मंगळू बोरसे यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा 33,694 मतांनी दणदणीत पराभव केला. बोरसे यांनी तालुक्यात ल. तो. पवार यांच्यानंतर प्रथमच दोनवेळा आमदारकी मिळविण्याचा विक्रम केला असून बागलाणच्या राजकारणाने आता पूर्णपणे कूस बदलली आहे.
बागलाण विधानसभा मतदारसंघासाठी गुरु वारी सकाळी आठ वाजता येथील नवीन प्रशासकीय इमारतीत मतमोजणीस प्रारंभ झाला. याठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच प्रशासकीय इमारतीच्या परिसरात वाहनांना मज्जाव करण्यात आला होता. मतमोजणी कक्षात एकूण चौदा टेबलची मांडणी करण्यात आली होती. प्रारंभी टपाली मतांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीच्या पहिल्या फेरीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीत बोरसे यांना 5449 तर चव्हाण यांना 3909 मते मिळाली. यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने एकेक फेरीची मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासून अखेरच्या एकवीसाव्या फेरीपर्यंत भाजपाचे बोरसे यांची आघाडी टिकून राहिली. फेरीनिहाय आकडेवारीची माहिती ध्वनिक्षेपकावरून जाहीर होताच समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात येत होती. एकूण एकवीस फेऱ्या झाल्यानंतर टपाली मतमोजणी करण्यात आली. शेवटच्या फेरीअखेर बोरसे यांना 94,683 तर चव्हाण यांना 60,989 मते मिळाली. त्यामुळे भाजपचे बोरसे हे 33,694 मतांनी विजयी झाल्याची घोषणा करून त्यांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विजयानंतर भाजप समर्थक व बोरसे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
विजयाची तीन कारणे...
1जनसामान्यांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचा स्वभाव, कमालीची साधी राहणी तसेच कार्यकर्त्याच्या भूमिकेतून लढणारा व सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा नेता.
2बागलाण तालुक्यातील पाणी, रस्ते, विकासकामे तसेच शेतीप्रश्नांची उत्तम जाण.
3राजकीय हेवेदावे न ठेवता स्वच्छ राजकारण, विकासासाठी तसेच जनतेच्या न्यायहक्कांसाठी झोकून देऊन काम करणारा व स्वच्छ प्रतिमा ही बलस्थाने.
चव्हाणांच्या पराभवाचे कारण...
तालुक्यातील काही कामे मार्गी लावण्याचा चांगला प्रयत्न केला असला तरी ग्रामीण जनतेशी संपर्काचा काहीसा अभाव, पुनंद पाणीपुरवठा योजनेबाबत राजकारण केल्याचा आरोप, सटाण्याचा बायपासचा रखडलेला प्रश्न, सिंचनाचे प्रश्नांबद्दल नाराजी.
पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते
१ दीपिका चव्हाण राष्ट्रवादी 60989
२ अंजना मोरे बसपा 981
३ गुलाब गावित अपक्ष 1547
४ राकेश घोडे अपक्ष 5196
५ पंडित बोरसे अपक्ष 1204